मरीन ड्राइव्ह येथील समुद्राच्या लाटांचे छायाचित्र काढत असताना रविवारी पाण्यात पडलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. रतन चव्हाण (२०) असे मृत तरुणाचे नाव आहे.
डोंबिवलीतील पाच तरुण रविवारी मरीन ड्राईव्ह समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आले होते. रविवारी दुपारी भरतीच्या लाटा सुमारे पावणेपाच मीटर उंच उसळत होत्या. या लाटा पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. या पाच तरुणांपैकी चेतन चव्हाण (१६) हा तरुण दुपारी तीनच्या सुमारास हॉटेल इंटरकॉन्टिनेन्टलसमोरील कठडय़ाच्या खालील दगडावर उभे राहून मोबाइलने छायाचित्र काढत होता. एका मोठय़ा लाटेमुळे तो खाली पडला आणि गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी त्याचा चुलत भाऊ रतनही दगडांवर गेला. परंतु पाण्याच्या प्रवाहाने तो खाली पडला. यावेळी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार स्वप्नील खोंडे आणि कुंभार या ठिकाणी गस्तीवर होते. त्यांनी चेतनला वाचविण्यात यश मिळवले. मात्र रतन पाण्यात वाहून गेला.