प्रियकराला पाठवलेले अतिशय खासगी सेल्फी मोबाइलमधून नष्ट (डिलीट) करण्यास त्याने नकार दिल्याने निराश झालेल्या १७ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घाटकोपरमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकर असलेल्या संगणक शिक्षकाला अटक केली आहे. प्रेमाच्या ओघात या तरुणीने आपल्या प्रियकराला अतिखासगी सेल्फी मोबाइलवरून पाठवले होते. मात्र, या छायाचित्रांचा गैरवापर होण्याच्या किंवा ती इतरांपर्यंत पोहोचण्याच्या भीतीने तिने त्याच्याकडे ही छायाचित्रे हटवण्यासाठी लकडा लावला होता; परंतु त्याने त्यास नकार दिल्याने बदनामीच्या भीतीने या तरुणीने आत्महत्येचा मार्ग निवडल्याचे तपासात समोर आले आहे.

घाटकोपर पश्चिम येथे राहणारी सुमन (बदललेले नाव) या १२वीतील तरुणीने सहा महिन्यांपूर्वी संगणक वर्गात प्रवेश घेतला होता. त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचे काम करणाऱ्या शंभो मदेसिया (२३) याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. या दोघांत मोबाइलवरून सतत संवाद सुरू असे. यादरम्यानच शंभोने सुमनकडे तिचे काही खासगी सेल्फी काढून पाठवण्याचा आग्रह धरला. सुमननेही प्रेमाच्या भरात अशी छायाचित्रे काढून शंभोला पाठवली. तसेच ही छायाचित्रे नंतर मोबाइलमधून ‘डिलीट’ करण्याची सूचना त्याला केली. मात्र, ही छायाचित्रे सुरक्षित असून ती कोणालाही दाखवणार नाही, असे सांगून शंभो प्रत्येक वेळी तिला टाळत होता. या मुद्दय़ावरून दोघांत वादावादीही झाली.

आपली छायाचित्रे कुणी पाहिली किंवा त्याविषयी माहिती झाली तर बदनामी होईल, या भीतीने निराश झालेल्या सुमनने ३० जुलै रोजी तिच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कोणतेही कारण कुटुंबीयांना कळत नव्हते. कुटुंबीयांनी तिचा भ्रमणध्वनी तपासला असता, त्यात तिचे शंभोशी झालेले संभाषण त्यांच्या नजरेस पडले. त्यावरून तातडीने कुटुंबीयांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याची तक्रार दाखल केली. आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्य़ात शंभोला पोलिसांनी अटक केली आहे.