रेल्वे मोटरमन आणि प्रवाशांची मस्करी करणारे व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करणं तीन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. रेल्वे पोलिसांना या तरुणांना अटक केली आहे. हे तरुण मोटरमन तसंच प्रवाशांची खिल्ली उडवणारे व्हिडीओ शटू करुन आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड करायचे. लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी त्यांनी हा मार्ग अवलंबला होता. यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. मात्र अशा पद्धतीने मोटरमन सोबत प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी तरुणांना अटक करण्यात आली आहे. तिघांना जामीनही मंजूर झाला आहे.

अभिषेक (२३), राहुल गोडसे (१९) आणि शुभम शुक्ला (१९) अशी या तरुणांची नावे असून सर्वजण विक्रोळीचे रहिवासी आहेत. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युट्यूबवरील अशाच पद्धतीचे व्हिडीओ पाहून तरुण प्रेरित झाले होते. अभिषेक याने त्यांच्या कॉलेजमधील एका मित्राने असे व्हिडीओ शूट करण्यासाठी स्पॉन्सर करण्याचं आश्वासन दिलं असल्याचं सांगितलं.

“आम्हाला प्रँक व्हिडीओच्या माध्यमातून पैसे कमवायचे होते. टीम ब्लेड असं आमच्या ग्रुपला आम्ही नाव दिलं होतं. आम्ही पार्कमध्ये लोकांवर खोटे साप फेकून प्रँक करण्यास सुरुवात केली होती. आमच्या एका व्हिडीओला एक लाख लोकांनी पाहिलं होतं”, असं अभिषेकने सांगितलं आहे.

“तिन्ही आरोपी मोटरमन आणि प्रवाशांना टार्गेट करत होते. आम्हाला पाच मोटरमनकडून तक्रार मिळाली होती. सीएसटी आणि चर्चगेट स्थानकावरील मोटरमनना ते टार्गेट करायचे. काहीतरी मुर्खासारखे प्रश्न विचारुन त्यांना चिडवायचे”, अशी माहिती आरपीएफने दिली आहे.

तरुणांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तरुण मोटरमनला मी माझ्या भावाच्या खेळण्यातली ट्रेन चालवून शिकलोय, मला रेल्वे चालवायला द्या म्हणून सांगत होता.

जून महिन्यात तरुणांविरोधात पहिली तक्रार आली होती. पण त्यांचा शोध घेणं रेल्वे पोलिसांसाठी खूप कठीण होतं. आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील आणि सोलंकी यांनी व्हिडीओची चाचपणी केल आणि सोशल नेटवर्किंग साईटवर त्यांचा शोध सुरु केला.

या व्हिडीओंमध्ये विक्रोळी ही एक समान गोष्ट असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी विक्रोळीत शोध सुरु केला असता एक आरोपी रेल्वे स्थानकावर दिसला. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे इतर दोघांना अटक करण्यात आलं.

“मोटरमन प्रचंड तणावात असतात. प्रवाशांची सुरक्षा आणि वेळ पाळणे ही त्यांची प्राथमिकता असते. त्यांच्या कामाचं कौतुक करण्याऐवजी काहीजण त्यांना अशाप्रकारे त्रास देत आहेत हे प्रचंड वाईट आहे”, असं आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त (मध्य रेल्वे) सचिन भालोदे यांनी म्हटलं आहे.