नाटय़संगीत परंपरेचे जतन व संवर्धन करण्यासाठी आणि नाटय़ संगीताचा हा ठेवा तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने वसंतराव देशपांडे संगीत सभा या संस्थेतर्फे २९ एप्रिल रोजी ‘रंगसंगीत शाकुंतल ते कटय़ार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि मार्गदर्शन ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पं. चंद्रकांत लिमये यांचे आहे.

यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा येथे रात्री ८.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, सावनी रवींद्र यांच्यासह स्वानंद भुसारी, सीमा ताडे, केतकी तेंडोलकर, ओंकार मुळे हे तरुण गायक-गायिका सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाबाबत ‘लोकसत्ता मुंबई’ला अधिक माहिती देताना पं. लिमये म्हणाले, नाटय़संगीत ही उपशास्त्रीय संगीताला मिळालेली मोठी देणगी आहे.

शास्त्रीय संगीत राजे-महाराजे यांचे महाल आणि ठरावीक लोकांपुरतेच मर्यादित होते. नाटय़संगीताच्या माध्यमातून हे शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले व नाटय़संगीताबद्दल लोकांमध्ये आवड निर्माण झाली.

हिंदुस्थानी संगीतातील बंदिशी, ठुमऱ्या, दादरे असे सर्व मूळ हिंदी प्रकार मराठी बाज व नाटय़भाव घेऊन मराठी वळणाचे झाले. नाटय़संगीत हा एक स्वतंत्र संगीत प्रकार म्हणून नावारूपास आला.

या सगळ्यात मराठी नाटय़संगीताच्या इतिहासातील सर्व बुजुर्ग आणि गुरूंचे मोठे योगदान आहे. ‘तुमसे बचन दे मै हारी बलमा’ ही मूळ ‘दादरा’ प्रकारातील हिंदी रचना मराठीत ‘मला मदन भासे हा मोहे मना’ अशा स्वरूपात आली किंवा ‘कत्ल मुझे कर डाला रामा पास बुलायके नजर मिलायके’ हा कोठीवरचा हिंदी दादरा ‘सत्यवदे वचनाला नाथा’ असे अस्सल मराठी रूप घेऊन आला.

या आणि अशा काही मूळ रचना व त्यावरून तयार झालेली नाटय़पदे तसेच अन्य नाटय़पदे सादर होणार आहेत. आत्ताच्या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते श्रोत्यांसमोर उत्तम आणि गुणवत्तापूर्ण नक्की देऊ शकतात, असा विश्वासही पं. लिमये यांनी व्यक्त केला.