आपली मते १४० अक्षरांमध्ये मांडण्याचे बंधन असलेल्या ट्विटर या समाज माध्यम संकेतस्थळावर आता तुम्हाला भल्ली मोठी कथाही शेअर करता येणार आहे. नव कथा लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ट्विटर इंडियाने अनोखी स्पर्धा सुरू केली आहे. यातील विजेत्यांना जयपूर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात सहभागी होता येणार आहे.
देशातील तरुण लेखकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने १३ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांनी लिहिलेले साहित्य या स्पध्रेत सहभागी करून घेतले जाणार आहे. यामध्ये कविता, रहस्य कथा, प्रेमकथा, विज्ञान कथा, लघुकथा, ऐतिहासिक कथा, आध्यात्मिक, भयकथा, थरारकथा अशा विविध साहित्य प्रकारातील कथांचा समावेश असू शकतो. या कथा इंग्रजी आणि हिंदीसह अन्य सात भारतीय भाषांमध्ये स्वीकारल्या जाणार आहेत. यासाठी ट्विटरने या स्पध्रेसाठी वॉटपॅड या लेखक आणि वाचक जोडणाऱ्या संकेतस्थळाचे सहकार्य घेतले आहे. तज्ज्ञ परीक्षकांनी निवडलेल्या पाच कथा लेखकांना जयपूर येथे जानेवारीत होणाऱ्या साहित्य संमेलनात सहभागी होता येणार आहे. यासाठी ट्विटरने #YourStoryIndia  हा हॅशटॅग केला आहे. स्पध्रेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबपर्यंत तुमची कथा Wattpad.com या संकेतस्थळावर अपलोड करावी. यानंतर वॉटपॅडची लिंक ट्विट करून त्याला जास्तीत जास्त री ट्विट मिळवावे. स्पध्रेचा निकाल जाहीर करताना ट्विटरवर एखाद्या कथेच्या पसंतीचा विचारही केला जाणार आहे.