लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : लग्नास नकार देणाऱ्या तरुणीवर सूड उगवण्यासाठी तिच्या नावे सौदी अरब दूतावास आणि वसरेवा येथील एका शाळेला धमकीचे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीस कफ परेड पोलिसांनी अटक केली. सुजीत गिडवाणी (४७) असे या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि तरुणी यांची ओळख समाजमाध्यमाद्वारे झाली. आरोपीने तरुणीला लग्नाची मागणी घातली. मात्र तरुणीने त्यास नकार दिला. नकार सहन न झाल्याने आरोपीने तरुणीच्या नावे कफ परेड परिसरातील अरब उच्चायुक्तालयाला पत्र पाठवले. त्यात ही इमारत बॉम्बस्फोट घडवून उडवून देऊ, अशी धमकी होती. पत्रावर तरुणीचे नाव आणि पत्ता होता. हे पत्र पश्चिम उपनगरातील एका टपाल कार्यालयातून पाठविण्यात आले होते. हे पत्र मिळताच दूतावासातील अरब अधिकाऱ्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी प्रथम संबंधिक तरुणीला ताब्यात घेत चौकशी सुरू केली.

पोलिसांच्या तपासात सदर प्रकरणात तरुणीचा अजिबात संबंध नसल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी वेगळय़ा मार्गे तपास सुरू केला. हे पत्र लिहिण्यामागे तरुणीला अडचणीत आणण्याचा प्रकार तर नाही ना, या तर्काच्या आधारे त्यांनी चौकशी सुरू केली. त्यात सुजीतचे नाव पुढे आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने तरुणीवर सूड उगवण्यासाठी तिच्या नावे धमकीचे पत्र लिहिल्याचे कबूल के ले. सुजित हा अंधेरी परिसरात आपल्या कुटुंबासह राहतो. विशेष म्हणजे, त्याने असेच एक पत्र वसरेवा येथील शाळेलाही पाठवले होते.