वडाळा येथील विजयनगर परिसरात पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी बुधवारी अटक केली. आलम अन्सारी असे या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीने या आरोपीस ओळखल्याचे पोलिसांनी सांगितले.
 २१ एप्रिल रोजी वडाळ्याच्या विजय नगर परिसरातील या  पाच वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. रात्री साडेदहा वाजता या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. ती रात्री बारा वाजता जखमी अवस्थेत सापडली होती. मात्र गुन्हा कुणी दाखल करायचा या अँटॉप हिल आणि वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्याच्या वादातून ही मुलगी अडीच तास उपचाराविना राहिली होती. आयुक्तांनी गंभीर दखल घेते दोन्ही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक आरोपी दिसत होता. त्याचे रेखाचित्रे तयार करण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी पोलिसांनी आलम अन्सारी या २६ वर्षीय तरुणास अटक केली आहे. पीडित मुलीने त्याला ओळखल्याचे पोलिसांनी सांगितले. आलम एका खासगी कपडय़ाच्या कंपनीत काम करतो. त्याची अधिक चौकशी सुरू असून त्याचा अन्य काही गुन्ह्य़ात सहभाग होता का ते स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.