पाकिस्तानी नागरिकाच्या सांगण्यावरून अर्थसहाय्य

दहशतवादविरोधी यंत्रणांनी मुंबईतून अटक केलेल्या जावेद नवीवाला, अल्ताफ कुरेशी या दोन तरुणांच्या चौकशीतून आयएसआयची (पाकिस्तानी गुप्तहेर संघटना इंटर सव्‍‌र्हिस इंटेलिजन्स) पाळेमुळे उघड होत आहेत. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाच्या कोठडीत जावेद, अल्ताफ यांनी इक्बाल व दानिश या आयएसआयशी संबंधित दोन व्यक्तींबाबत तपशीलवार माहिती उघड केली आहे. २००७ मध्ये पाकिस्तानी नागरिक इक्बालसोबत जावेदशी ओळख झाली. तेव्हापासून जावेद हवालाच्या माध्यमातून आयएसआयला आर्थिक साहाय्य करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

३ मे रोजी दहशतवादविरोधी यंत्रणांनी उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथून आफ्ताब याला अटक केली. आफ्ताब दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांसोबत पाकिस्तानातील आयएसआय एजंटांच्या सातत्याने संपर्कात होता. २०१४ मध्ये तो अधिकृतरीत्या पाकिस्तानात गेला होता. यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार त्या दौऱ्यात आयएसआयने आफ्ताबला माहिती गोळा करण्याबाबत प्रशिक्षण दिले होते.

आफ्ताबच्या चौकशीतून मुंबईच्या आग्रीपाडय़ात राहणारा हवाला ऑपरेटर जावेद आणि त्याच्याकडे काम करणारा अल्ताफ यांची नावे समोर आली. अल्ताफकडून तब्बल ७० लाख रुपये हस्तगत करण्यात आले, तर जावेदने अलीकडेच आफ्ताबच्या खात्यात १५ हजार रुपये जमा केल्याची बाबही समोर आली. पुढील चौकशीत या दोघांनी गेल्या काही वर्षांमध्ये आफ्ताबसह अन्य आयएसआय एजंटांना लाखो रुपयांचे अर्थसाहाय्य केल्याची बाब उघड झाली.

दरम्यान, इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या यासीन भटकळ २०१३ मध्ये मुंबईत वास्तव्यास होता. जावेद, अल्ताफ यासीन किंवा इंडियन मुजाहिदीनच्या संपर्कात होते का, त्यांना अर्थसाहाय्य केले होते का, याबाबत महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक चौकशी व तपास करते आहे.