मंदसौरच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या घाटकोपरमध्ये आज युवक काँग्रेसच्या वतीने रेल रोको करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांना निमचमध्ये ताब्यात घेतल्याचा निषेधही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मंदसौरमध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागत आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत गोळीबार केला. या गोळीबारात पाच शेतकरी मारले गेले. मंगळवारी झालेल्या या घटनेचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. आजच राहुल गांधी यांना निमचमध्ये ताब्यात घेण्यात आले. ज्यानंतर मोदी सरकारविरोधात राहुल गांधी यांनी टीकेचे ताशेरे झोडले होते. आता त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीने रेल रोको करण्यात आला. या आंदोलना पोलिसानी लक्ष घालून रेल रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना दूर केले. तरीही आंदोलकांनी घोषणाबाजी सुरुच ठेवली होती. राहुल गांधी यांना ताब्यात का घेण्यात आले आहे? असा प्रश्न विचारत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हंगामा केला. एवढंच नाही तर मंदसौरच्या शेतकऱ्यांना राहुल गांधी यांना का भेटू दिले जात नाही? असाही प्रश्न आंदोलकांनी विचारला आहे. राहुल गांधी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे राजकारण करत आहेत असा आरोप मध्यप्रदेशचे गृहमंत्री भुपेंद्र सिंग यांनी केला. ज्यानंतर देशभरातले काँग्रेस कार्यकर्ते संतापले. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये झालेले रेल रोको आंदोलनही याच निषेधाचा एक भाग होता. तसंच मंदसौरच्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी केली.