एखादी कल्पना क्रांतीकारी बदलाला कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच यंदाच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) ‘टेकफेस्ट’ या तंत्र व विज्ञान महोत्सवाअंतर्गत ‘आयडिएट’ या सामाजिक प्रश्नांवर तरुणांच्या ‘डोकॅलिटी’ला आव्हान देऊन उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारी स्पर्धा पुन्हा एकदा होणार आहे. या वर्षी २ ते ४ जानेवारी दरम्यान ‘टेकफेस्ट’ होणार आहे.
कल्पना व त्यातून होणारे संशोधन-तंत्रज्ञान विकास हा व्यक्ती-मानवी समूहाचे जीवनच बदलून टाकते. त्यातून भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये बदलाची गरज मोठी आहे. म्हणूनच यंदाही ‘टेकफेस्ट’ने ही स्पर्धा कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांचे  मान्सूनवरील अवलंबित्व कमी करणे, तसेच त्यांना कमी खर्चाच्या ऊर्जानिर्मितीचे अन्य मार्ग सुचविणे, पर्यावरण संवर्धनासाठी उपाय सुचविण्यासाठी ‘परिश्रम’, ‘उज्ज्वल’, ‘गेम चेंजर’ या तीन विभागांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमधून विद्यार्थ्यांना तब्बल सव्वादोन लाख रुपयांच्या बक्षिसांची लयलूट करता येणार आहे. याशिवाय ‘टेक्नोकॅलिप्स’ या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या आणखी एका स्पर्धेचे आयोजनही ‘टेकफेस्ट’च्या निमित्ताने करण्यात आले आहे.
मुंबई, भुवनेश्वर, इंदूर, हैदराबाद आणि जयपूर या पाच शहरांत ही स्पर्धा होईल. याकरिता ३० लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. अंतिम फेरीकरिता निवडलेल्या चमूंना २ ते ४ जानेवारी दरम्यान पवईमध्ये ‘आयआयटी’च्या संकुलात होणाऱ्या अंतिम स्पर्धेत सहभागी होता येईल.
संपर्क :   http://www.techfest.org