पबजी गेम खेळण्याच्या व्यसनानं कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील तरुण सुयोग अरुण क्षीरसागर (वय २३) या तरुणाने जीव गमावला आहे. या गेममुळे तालुक्यात जीव गमवावा लागलेला सुयोग हा तिसरा तरुण आहे. या गेमचे व्यसन जडलेले शेकडो तरुण आजही तालुक्यात असून, पालक हतबल झाले आहेत.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील व्यावसायिक अरुण क्षीरसागर यांचा मुलगा सुयोग हा गेल्या वर्षांपासून पबजी गेमच्या आहारी गेला होता. सुयोग हा सुशिक्षित तरुण होता. बारावीच्या शिक्षणानंतर वडिलांना व्यवसायात तो मदत करू लागला होता. गेल्या दोन वर्षांंमध्ये अँड्रॉईड मोबाईल खरेदी करून इतर मित्रांचे पाहून तोही पबजी गेम खेळण्यास शिकला. त्यालाही हळूहळू पबजी खेळण्याचे व्यसन जडलं. दुकानामधून मोकळा वेळ मिळाल्यानंतर तो पबजी गेममध्ये व्यग्र असायचा. गेल्या पंधरा दिवसांपासून तो मनोरुग्ण अवस्थेत गेला आणि काहीही न बोलता गावामध्ये रात्रंदिवस फिरत असे. आठ दिवसांपूर्वी त्याचे पालक अरुण क्षीरसागर यांनी त्याला नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही, अखेर त्याची प्राणजोत मालवली.