सांताक्रूझमधील वाकोल्यातील एका तरुणाचा सातव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. तरुण मोबाईल वापरत असताना इमारतीच्या गच्चीवरुन पडल्याने रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. हा तरुण मोबाईलवरुन बोलत असताना खाली पडला की मोबाईलवर गेम खेळत असताना ही घटना घडली, हे नेमके समजू न शकल्याचे पोलिसांनी सांगितले.

इमारतीवरुन पडल्याने प्राण गमावलेल्या तरुणाचे नाव अभिषेक भोसले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अभिषेक सांताक्रूझ पूर्वमधील वाकोला पाईपलाईन परिसरातील मंगलमूर्ती को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा रहिवासी होता. डिप्लोमाचा विद्यार्थी असलेला अभिषेक गेल्या काही दिवसांपासून नाराज होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. ‘रविवारी रात्री १० च्या सुमारास अभिषेकने त्याच्या आईला तो फेरफटका मारण्यासाठी गच्चीवर जात असल्याचे सांगितले. यावेळी त्याने त्याचा मोबाईलदेखील सोबत घेतला,’ असे अभिषेकच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. काही तरुणांनी अभिषेकला इमारतीवरुन खाली पडताना पाहिले. यानंतर या तरुणांनी घटनेची माहिती अभिषेकच्या कुटुंबीयांना दिली. यानंतर अभिषेकला तातडीने व्ही. एन. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी अभिषेकला मृत घोषित केले.

‘मोबाईलवर बोलताना अभिषेक इमारतीवरुन खाली पडला असावा, असा अंदाज आहे. अभिषेक गच्चीच्या कठड्यावर बसला असताना तो खाली कोसळला असावा, असाही अंदाज आहे. इमारतीचा कठडा अतिशय लहान आहे. त्यावरुन तोल गेल्याने खाली पडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. सुरुवातीच्या तपासावरुन ही आत्महत्येची घटना असल्याचे वाटत नाही. मात्र तरीही आमचा तपास सुरू आहे.’ अशी माहिती वाकोला पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वावळ यांनी दिली आहे.

‘दुर्घटना घडताना अभिषेक फोटो काढत नव्हता. या प्रकरणाची नोंद अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अभिषेक मोबाईल वापरत असताना सातव्या मजल्यावरुन पडल्याने त्याच्या मोबाईलच्या डिस्प्लेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी अभिषेकचे कॉल रेकॉर्ड्स मागवण्यात आले आहेत. यामुळे त्यावेळी अभिषेक कोणासोबत मोबाईलवरुन बोलत होता का, हे स्पष्ट होईल,’ अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.