कांजूरमार्गमधील घटना; गुन्हा लपविण्याचा कुटुंबाचा प्रयत्न फसला

मद्यपान करून कुटुंबियांना त्रास देणाऱ्या धाकटय़ा भावाची तरूणाने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मद्यधुंद अवस्थेतील भावाचा काचेवर पडून मृत्यू झाल्याचे  भासविण्याचा प्रयत्न या तरूणाने केला. त्यामुळे पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली; परंतु गुन्हे शाखा कक्ष ७ ने या प्रकरणाचा समांतर तपास करून गुन्हा लपविण्याचा प्रयत्न हाणून पाडला.

कांजूरमार्ग (पू.) येथील शास्त्रीनगर परिसरात डिसूझा कुटुंब राहते. या कुटुंबाची परिसरात मालमत्ता असून त्यातून चांगले उत्पन्न त्यांना मिळते. जितो (२४ वर्षे), जियोआन (२८) आणि निझेल (३१) असे तीन भाऊ एकत्रच राहतात. मात्र जितोला दारूचे व्यसन होते. मद्यप्राशन करून शिवीगाळ करण्याच्या त्याच्या सवयीला कुटुंबीय त्रासले होते. ९ जुलै रोजी बेशुद्धावस्थेत जितोला त्याच्या कुटुंबीयांनी शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. कमरेला खोल जखम झालेल्या जितोला थेट अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मद्यधुंद अवस्थेत काचेवर पडल्याने ही जखम झाल्याचे डिसूझा कुटुंबीयांनी डॉक्टरांना आणि पोलिसांना सांगितले. १४ जुलै रोजी जितोचा मृत्यू झाला. कांजूरमार्ग पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू अशी नोंद केली. मात्र गुन्हे शाखा कक्ष ७ च्या अधिकाऱ्यांना संशय आला. पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण १) शशिकांत सातव, साहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांनी तपासाला सुरुवात केली. सर्व कुटुंबीयांना चौकशीसाठी बोलावून त्यांना सर्व घटनाक्रम पुन्हा उलगडण्यास सांगितले. कुटुंबीयांच्या बोलण्यात विसंगती असल्याचे कक्ष ७ च्या अधिकाऱ्यांना चटकन लक्षात आले. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर अखेर, जियोआनने आपणच जितोची हत्या केल्याचे कबूल केले.

९ जुलैच्या रात्री जितो मद्यधुंद अवस्थेत कुटुंबीयांना शिवीगाळ करीत होता. त्याला आवरण्याचा प्रयत्न होत असताना जितोने निझेल याच्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला लाथ मारली. त्यावेळी जियोआनने जितोची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.