युवा विज्ञान परिषदेत भित्तीपत्राद्वारे ३१० संकल्पनांचे सादरीकरण

मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या युवा विज्ञान परिषदेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संशोधन संकल्पनांमध्ये मूलभूत विज्ञानाऐवजी तंत्रज्ञानाधारित संशोधनाचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थी मूलभूत विज्ञानात अभ्यास करण्यापेक्षा सुलभ व सोप्या अशा तंत्राधारित प्रकल्पांना प्राधान्य देत असल्याने ही बाब गंभीर असल्याची खंत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

मुंबई विद्यापीठ आणि डॉ. एम.एस.स्वामिनाथन संशोधन संस्था आणि एसआरएम विद्यापीठाच्या वतीने मुंबई विद्यापीठात आठव्या भारतीय युवा परिषदेत दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या संशोधनांचे भित्तीपत्राद्वारे सादरीकरण झाले. यंदा भित्तीपत्राद्वारे ३१० संकल्पना सादर झाल्या आहेत. यातील बहुतांश संकल्पना या तंत्रज्ञानाशी संबंधित असून त्याचा मूलभूत विज्ञानाशी फारसा संबंध असल्याचे दिसून आले नाही.

विद्यार्थ्यांचा या प्रकल्पाकडे ओढा असल्याचे पाहून अनेक ज्येष्ठ वैज्ञानिकांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रत्यक्षात यामध्ये मूलभूत विज्ञानाआधारित तसेच कृषी, सर्वासाठी अन्न आणि हवामान बदल या विषयावर प्रकल्प सादर होणे अपेक्षित मात्र या विषयाशी संबंधित मोजकेच प्रकल्प असल्याने तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नैसर्गिक साधन सामुग्री जतनाची गरज, नॅनो विज्ञान, औषधे, सुरक्षा आणि तंत्रज्ञान यासारख्या अनेक विज्ञान प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये घरगुती उपकणे ब्लूटय़ूथच्या माध्यमातून कशा प्रकारे नियंत्रित करता येऊ शकतील यावर संशोधन केले आहे; तर दापोली अर्बन बँक सीनिअर विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील दिव्याचे स्वयंचलित प्रारूप कसे तयार करता येईल याची संकल्पना मांडली आहे. शुक्रवारी या प्रकल्पांचे परीक्षण झाले असून शनिवारी प्रत्येक विभागातील सवरेत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

मूलभूत विज्ञानाकडे दुर्लक्ष

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संकल्पनांमध्ये १६ प्रकल्प जैविक संसाधन आणि हवामान बदल या विषयावर आहेत, तर पाच प्रकल्प पूर्वसूचना यंत्रणा सक्षम करण्यासंदर्भात आहेत; तर १५ प्रकल्प कार्बन आणि ऊर्जा या विषयावर आधारित आहेत. ४० प्रकल्प नैसर्गिक संपत्तीचे व्यवस्थापनावर आधारित आहेत, तर २३९ प्रकल्प विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांवर आहेत. यंदाच्या प्रदर्शनात बहुतांश प्रकल्प हे तंत्रज्ञानाधारित आहेत. ही बाब चांगली असली तरी विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञान विसरून चालणार नाही असे मत युवा परिषदेला उपस्थित एक वैज्ञानिकाने व्यक्त केले.