वेदांमधील विज्ञान अभ्यासण्याचा वैज्ञानिक अरविंद उंटवाले यांचा सल्ला

भारतीय वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक संकल्पना दडलेल्या आहेत. तरुणांनी या संकल्पनांचा अभ्यास करावा, असा सल्ला भारतीय युवा विज्ञान परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ वैज्ञानिक अरविंद उंटवाले यांनी दिला. पुराव्यावर चालणाऱ्या विज्ञानामध्ये ग्रंथांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिल्याने विज्ञान क्षेत्रात पुन्हा एकदा भुवया उंचावल्या गेल्या आहेत. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठात पार पडलेल्या विज्ञान परिषदेत कॅप्टन (निवृत्त) आनंद बोडस यांनी भारतात सात हजार वर्षांपूर्वी विमान उडाल्याच्या केलेल्या दाव्याची आठवण झाली.

पुरातन काळात ऋषी मुनींनी ध्यानाच्या माध्यमातून विशेष शक्ती निर्माण करून अनेक प्रयोग केले आहेत. या प्रयोगांच्या नोंदी वेदांमध्ये श्लोकांच्या माध्यमातून केल्या आहेत. यामुळे प्रत्येक श्लोकाला दोन किनारी आहेत. एक आलंकारिक व दुसरी वैज्ञानिक. यातील वैज्ञानिक किनार समजून घेण्यासाठी युवा वैज्ञानिकांनी संस्कृत शिकावे व वेदांचा अभ्यास करून त्यातील वैज्ञानिक बाबी जगासमोर आणायला हव्यात असेही उंटवाले म्हणाले. याचबरोबर विज्ञान शिक्षणपद्धतीचा समाचार घेत उंटवाले यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेच्या बाहेर जाऊन विज्ञान शिकविण्याची गरज आहे. आधुनिकतेच्या जगात तुम्ही सर्व पुढे धावत आहात. पण असे करीत असताना भूतकाळाला विसरू नका. आपल्या इतिहासाने आपल्याला बरेच काही दिले आहेत. तुम्ही सर्व वैज्ञानिक नाहीत असे समजू नका. फक्त तशा प्रकारचा विचार व्हायला हवा, मोठी स्वप्ने बघा असा गुरुमंत्रही त्यांनी या वेळी दिला.

मुंबई विद्यापीठ आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन आणि एसआरएम विद्यापीठाच्या वतीने मुंबई विद्यापीठात आठव्या भारतीय युवा परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, एसआरएम विद्यापीठाचे डॉ. सी. मुथामीचेलवन, एम. एस. स्वामिनाथन संशोधन संस्थेचे डॉ. व्ही. सेल्व्हम उपस्थित होते. प्रकृती बरी नसल्यामुळे प्रा. स्वामिनाथन या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.

पौराणिक प्रयोगांचे पुरावे मागणारे अज्ञानी

पुरातन काळात जे प्रयोग झालेत याचे पुरावे मागितले जातात. हे पुरावे मागणारे वेदांच्या बाबतीत अज्ञानी असल्याचेही उंटवाले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. असे पुरावे मागणाऱ्यांनी संस्कृतचा अभ्यास करून वेदांमधील विज्ञान वाचवे, असा सल्लाही उंटवाले यांनी दिला.

कुपोषणाचे मोठे आव्हान

हवामानातील बदल, समुद्राची पातळी आणि कुपोषण ही आपल्यासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी तरुण वैज्ञानिकांनी काम केले पाहिजे, असा सल्ला हरितक्रांतीचे जनक एम. एस. स्वामिनाथन यांनी दिला. हे काम करण्यासाठी भारतीय युवा विज्ञान परिषद एक उत्तम व्यासपीठ ठरेल, असे मतही त्यांनी या वेळी उपस्थित केले. या परिषदेच्या माध्यमातून तरुणांनी वेगवेगळय़ा संकल्पना मांडाव्यात हा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले. तुमच्या प्रवासात तुम्हाला अनेक अडथळे येतील पण त्या आव्हानांना तुम्ही कशा प्रकारे सामोरे जाता यावर तुमचा विजय अवलंबून असल्याचा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.