27 October 2020

News Flash

नोकरी, व्यवसाय खंडित झाल्याने मासे विक्रीत नवविक्रेते

तरुण व्यावसायिकांकडून समाजमाध्यमांचा प्रभावी वापर

तरुण व्यावसायिकांकडून समाजमाध्यमांचा प्रभावी वापर

मुंबई : टाळेबंदी वाढत गेली तशी अनेकांच्या नोकरी, व्यवसायावर कुऱ्हाड आली, तर काही व्यवसाय खंडित झाले. मात्र त्यातून रोजगाराचा पर्याय शोधत गेल्या दोन महिन्यात अनेकांनी घरपोच मासे आणि भाजी विक्री सुरू केली आहे. ओळखीच्या खात्रीशीर व्यक्तीकडून घरपोच मिळणारी सुविधा असल्याने त्यांचा प्रतिसाद वाढता आहे.

टाळेबंदीनंतर आस्थापनांनी ‘घरून काम करण्याचा’ पर्याय स्वीकारला. मात्र कालांतराने रोजगार कपातीलादेखील सुरुवात झाली. तर दुसरीकडे छोटय़ा प्रमाणातील स्वतंत्र व्यावसायिकांचे व्यवसाय खंडित झाले. समारंभाचे छायाचित्रण करणारे छायाचित्रकार आदी व्यावसायिकांना तर पुढील बराच काळ व्यवसायावर मंदीचे सावट दिसू लागले. अशा परिस्थितीत काहींनी इतर पर्याय म्हणून घरपोच मासे, भाजी विक्री व्यवसायात उडी घेतली.

मासे आणण्यासाठी मासळी बाजारात जाणे किंवा गल्लीच्या कोपऱ्यावर मासे मिळणे किंवा एखाद्या अन्य भाषिकाने आणलेल्या टोपलीतील मासळी घेणे हे यापूर्वीचे पर्याय असायचे. मात्र टाळेबंदीत एरवीच्या अन्य भाषिकांचे प्रमाण जवळपास बंदच झाले. तर गल्लीच्या कोपऱ्यावरील मासे विक्री मर्यादित होऊ लागली. या व्यवसायातील नेमकी ही कमतरता अनेकांना सध्या उपलब्ध झाल्याचे यातून दिसून येते.

व्यवसायाने छायाचित्रकार असलेल्या विक्रोळी येथील समीर जोशी यांनी सुरुवातीला आंबे विक्रीचा पर्याय अनुसरून पाहिला. मात्र वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने त्यास पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात त्यांनी मासे विक्रीला सुरुवात केली. सुरुवातीला छायाचित्रणामुळे तयार झालेल्या ओळखीतल्यांमध्ये त्यांनी मासे विक्रीबाबत माहिती दिली. त्यातून प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी आणखी संपर्क वाढवला. सध्या किमान २०० ग्राहकांचा व्हॉट्सअ‍ॅप गट तयार झाला असून आलिशान गृहनिर्माण संकुलापासून ते छोटय़ा – मोठय़ा वस्तीतून त्यांच्याकडे माशांसाठी मागणी नोंदविली जाते, असे जोशी यांनी सांगितले.

खात्रीशीर ओळखीच्या व्यक्तीकडून मिळणारे मासे हे या मागणीमागील कारण असल्याचे व्यवसाय सुरू करणारे नमूद करतात. घराबाहेर जाण्याचा धोका नको आणि एखाद्या सुपर मार्केटमधून गोठवलेले मासे आणायची गरज नाही आदी कारणेदेखील नवविक्रेत्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाचे कारण आहे.

सध्याची नोकरी असतानाच काही तरी अन्य पर्यायदेखील असणे गरजेचे असल्याचे करोनाने दाखवून दिल्याने जोड व्यवसाय सुरू केल्याचे प्रणव टिल्लू यांनी सांगितले. त्यातूनच घरपोच मासे विक्रीबरोबरच माशांचे तयार पदार्थदेखील मिळण्याची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे ग्राहकांनादेखील पर्याय उपलब्ध झाला. नेहमीच्या हॉटेलपेक्षा वेगळी चव, माफक किंमत आणि घरपोच सुविधा यामुळे प्रतिसाद वाढल्याचे ते म्हणाले.

समाजमाध्यम आणि ऑनलाइन व्यवहाराची जोड

मासे, भाजी आणि काही प्रमाणात विविध खाद्यपदार्थ घरूनच विकणाऱ्यांच्या व्यवसायाचा सारा डोलारा समाजमाध्यम आणि ऑनलाइन व्यवहारावर असतो. व्हॉट्सअ‍ॅप संदेश, फेसबुक पोस्ट, इन्स्टाग्राम स्टोरी अशा सर्व प्रकारचा अगदी मुक्त वापर यात होतो. सर्वांचीच मागणी ही व्हॉट्सअ‍ॅपद्वारेच नोंदवली जाते. तर पैसे देणे-घेणे ऑनलाइन माध्यमातूनही करणे सहजशक्य असल्याने मागणी वाढत असल्याचे हे नवविक्रेते सांगतात. तर अशा व्यवसायाचा वाढता प्रतिसाद पाहून मासेविक्रीसाठी खास संकेतस्थळ विकसित सुरू करण्याचा मनोदय एका व्यावसायिकाने व्यक्त केला.

श्रावणातही मागणी

अनेक ग्राहक श्रावणात मांसाहार वर्ज्य करतात. मात्र या नवव्यावसायिकांचे ग्राहक मिश्र स्वरूपाचे असल्याने श्रावण सुरू झाल्यानंतरही  मागणी मर्यादित स्वरूपात का होईना, मात्र सुरूच असल्याने व्यवसाय सुरू केल्यानंतर खंड पडला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 1:44 am

Web Title: youth started home delivery business of fish and vegetables during lockdown zws 70
Next Stories
1 मुंबईतील दहा विभागांत दररोज ५०० चाचण्या
2 करोना धास्तीपायी ब्युटी पार्लर, सलूनला अल्प प्रतिसाद
3 चेंबूरमधील पालिकेचे रुग्णालय करोनामुक्त
Just Now!
X