विनोद तावडेंच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा

आझाद मैदानावर काही तरुण उमेदवार गेले सहा दिवस उपोषणाला बसले आहेत. हे सर्वजण ‘एमए’ इंग्रजी पदवी उत्तीर्ण झाले असून राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात इंग्रजी अधिव्याख्याता हवे असल्यामुळे शासनाने लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा घेतली होती. त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर शासनाने त्यांना सेवेत घेणे अपेक्षित असताना गेल्या दोन वर्षांपासून त्यांना अधिव्याख्याता म्हणून सेवेत घेतले जात नसल्यामुळे गेले सहा दिवस ते उपोषणाला बसले आहेत. आता शासनाने आम्हाला सेवेत घेतले नाही तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करू, असा इशारा या उमेदवारांनी दिला आहे.

राज्यात भाजपचे शासन आल्यापासून गेली दोन वर्षे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरीत सामावून घेण्यात येत नसल्यामुळे अनेकदा या उमेदवारांनी मंत्रालयाचे उंबरठे झिजवले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे अनेकदा भेटून निवेदने दिली. या उमेदवारांपैकी २२ जणांना इंग्रजी अधिव्याख्याता म्हणून शासनाने सेवेत सामावून घेतले असून उर्वरित सुमारे साठ लोकांना सेवेत जागा नसल्याचे कारण सांगून घेतले जात नाही. २०१३ साली ९२ अधिव्याख्यात्यांच्या जागांसाठी शासनाने जाहिरात दिली. लोकसेवा आयोगाने २०१४ परीक्षा घेऊन ८७ जणांनी निवडही केली. तशी रीतसर पत्रेही या उमेदवारांना पाठविण्यात आली.

शासकीय सेवेत निवड झाल्यामुळे यातील अनेकांनी आपल्या पूर्वीच्या नोकरीचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालातील कंत्राटी अधिव्याख्यात्यांना सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिल्यामुळे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत घेण्यात आले नाही. सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटी अधिव्याख्यात्यांना सेवेत घेण्याचे आदेश देताना लोकसेवा आयोगाने निवडलेल्या उमेदवारांना सेवेत घेऊ नये असे कोठेही म्हटलेले नसतानाही मंत्रालयातील ‘बाबूं’नी कंत्राटी अधिव्याख्यात्यांना कायम केल्यामुळे जागा नसल्याचे कारण देत या उमेदवारांना घेण्यास नकार दिला. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सध्या असलेले इंग्रजीचे अधिव्याख्याते व विद्यार्थ्यांचे प्रमाण आणि शिकविण्याचा कालावधी यांचे गणिती कोष्टक मांडल्यास ७९ पदे रिक्त असल्याचे उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास ही बाब आणण्यात आली असली तरी काहीही उपयोग होत नसल्यामुळे गेले सहा दिवस हे उमेदवार आझाद मैदावार आमरण चक्री उपोषणाला बसले आहेत. गुणवत्तेवर परीक्षा व मुलाखत देऊन निवडून आल्यानंतरही न्याय मिळत नसल्यामुळे आता आम्ही शिक्षणमंत्री तावडे यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करू असे यातील काही उमेदवारांनी सांगितले.