मुंबई : वांद्रे (पू) ते कुर्ला (प.) दरम्यान आणि वांद्रे-कुर्ला संकुलात आता युलू ई-बाइक वापरून प्रवास करता येईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि युलू बाइक यांच्या माध्यमातून ही सुविधा सोमवारपासून सुरू झाली.

नवी मुंबईत काही ठिकाणी युलू ई-बाइकला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता वांद्रे आणि कुर्ला दरम्यानही युलू बाइक सुविधा सुरू झाली आहे. सोमवारी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्या प्रमुख उपस्थितीत या सुविधेचे उद्घाटन झाले. ‘वांद्रे आणि कुर्ला स्थानकात दररोज सुमारे तीन लाख प्रवासी उतरतात. त्यापैकी ७५ टक्के  रिक्षाचा वापर करून वांद्रे-कुर्ला संकुलात येतात. त्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल,’ असे राजीव यांनी सांगितले.

सध्या ही सुविधा वांद्रे रेल्वे स्थानक आणि वांद्रे-कुर्ला संकुलात एकूण नऊ ठिकाणी उपलब्ध आहे. यामध्ये सुमारे १०० ई-बाइक सध्या देण्यात आल्या आहेत. तर येणाऱ्या काळात एकूण १८ ठिकाणी ५०० ई-बाइक उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ सध्या ई-बाइक स्थानक नसले तरी लवकरच महापालिकेच्या माध्यमातून असे स्थानक निर्माण करण्यात येईल.ही सुविधा अ‍ॅप आधारित आहे.

’ सुरक्षा अनामत रक्कम- १९९ रुपये

’ सायकल स्थानकावरून घेण्याचा आकार- ५ रुपये

’ प्रति मिनिट दीड रुपये

’ ऑनलाइन बँकिंग तसेच पेटीएम वगैरे सुविधांचा वापर करून ई-वॉलेट रिचार्ज करण्याची सुविधा.

’ रुपये १८०- २४ तासांसाठी ई-बाइक सोबत ठेवता येईल. त्यापैकी चार तास चालवता येईल.

’ ३०० रुपये रिचार्ज केल्यास १०० रुपये अधिक लाभ- मर्यादा १ महिना.

’ ५०० रुपये रिचार्ज केल्यास २०० रुपये अधिक लाभ- मर्यादा २ महिने

’ १००० रुपये रिचार्ज केल्यास ५०० रुपये अधिक लाभ- मर्यादा ३ महिने