फेसबुकवर नाराजी व्यक्त केल्यामुळे अमर पावले यांची युवा ब्रिगेडमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर नेतृत्वाबाबत युवा सैनिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला असून त्याचे पडसाद सोमवारी उमटले. शिवडी परिसरातील अनेक युवा सैनिकांनी युवा सेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करीत लालबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे युवा सेनेला खिंडार पडले असून आणखी काही युवा सैनिक युवा सेना सोडण्याच्या तयारीत आहेत.

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या सभोवताली गोळा झालेले परप्रांतीय मित्रांचे कोंडाळे, मध्यमवर्गीय तरुणांना वाऱ्यावर सोडून उच्चभ्रूंकडे केंद्रित केलेले लक्ष, निकटवर्तीयांकडून केला जाणारा पाणउतारा अशा विविध कारणांमुळे युवा सेनेतील पदाधिकारी दुखावले आहेत. त्यांपैकी एक असलेले अमर पावले यांनी फेसबुकवर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

भाजपतर्फे सोमवारी लालबागच्या गणेश गल्लीमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये अमर पावले आणि त्यांच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर प्रथमेश लाड, नीलेश रायकर, प्रीतम पवार, हितेश साठे यांच्यासह शिवडी परिसरातील कार्यकर्त्यांनी सोमवारी युवा सेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.