विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षा देणे शक्य नाही, विद्यार्थ्यांनी एकत्र जमणे धोकादायक आहे, असे सांगून परीक्षेला विरोध करणाऱ्या विद्यार्थी संघटनांनी आता विद्यापीठे विद्यार्थी संमतीने घेत असलेल्या ऑनलाइन परीक्षांनाही दर्शविण्यास सुरुवात  केला आहे. ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ (आयसीटी) या अभिमत विद्यापीठाच्या परिक्षांना युवासेनेने विरोध केला आहे.

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यास युवासेनेसह काही विद्यार्थी संघटनांनी विरोध केल्यानंतर राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने अंतिम वर्षांच्या परीक्षा ‘ऐच्छिक’ करण्याचा पर्याय विद्यापीठांना दिला. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने परीक्षा न घेता विद्यापीठे वेगळे मार्ग शोधत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांची गर्दी टाळून ऑनलाइन किंवा ई-मेलच्या माध्यमातून परीक्षा घेणाऱ्या विद्यापीठांनाही विरोध करत संघटना दबाव आणत आहेत.

आयसीटीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा बुधवारपासून सुरू झाल्या. ऑनलाइन किंवा ई-मेलच्या माध्यमातून या परीक्षा घेण्यात येत आहेत. पुस्तकाचा आधार घेऊन (ओपन बुक) विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची आहे. अपवादात्मक स्थितीत एखाद्या हाताने उत्तरे लिहून छायाचित्र पाठवल्यास तेही ग्राह्य़ धरण्यात येणार आहे. मात्र या परीक्षा घेण्यास युवासेनेने विरोध केला. तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी ‘शासन निर्णया’नुसार परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठाला दिले आहेत.

शासन निर्णयाचाच विसर

शासनाने अंतिम विद्यार्थ्यांसाठी परीक्षा ‘ऐच्छिक’ केल्या आहेत. या निर्णयानंतर शासनाने कोणतेही नवे आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे या निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या संमतीने परीक्षा घेण्यात येऊ शकते. विद्यापीठ अनुदान आयोगानेही परीक्षांबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे नियमन करणाऱ्या विविध शिखर परिषदांनीही अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही.

विद्यार्थ्यांच्या संमतीनेच परीक्षा

‘विद्यार्थ्यांची मते गुगल फॉर्मच्या माध्यमातून संस्थेने जाणून घेतली. सर्व अभ्यासक्रमाच्या, सर्व वर्गाच्या विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यानंतरच परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी अनेक पर्याय दिलेले आहेत. परीक्षा सुरळीत सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यात येतील. ज्यांच्या परीक्षा किंवा संस्थेच्या निर्णय प्रक्रियेशी संबंध नाही अशा घटकांच्या दबावाला बळी पडून परीक्षा रद्द करण्यात येणार नाहीत. अंतिम वर्षांच्या परीक्षा झाल्यानंतर इतर वर्षांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची मते जाणून घेऊन, त्यांना काही अडचणी असल्यास त्या समजून घेऊन पुढील परीक्षांचा निर्णय घेण्यात येईल,’ असे संस्थेचे कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी सांगितले.