बहुतांश कारागीर गावी; उरलेल्यांवर बाजारपेठ पुन्हा सुरू करण्याचे आव्हान

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : कारागिरांनी करोनाच्या भीतीने गावची वाट धरल्याने मालक, कारागीर, ग्राहक यांचा कायम राबता असलेला दक्षिण मुंबईतील नामांकित झवेरी बाजार ओस पडला आहे. सोन्या-चांदीची बाजारपेठ पुन्हा जुने दिवस येतील याची वाट पाहत इथल्या सामग्रीची काळजी घेत आहेत.

शेख मेमन स्ट्रीट, जुनी हनुमान लेन, भुलेश्वरचा विठ्ठलवाडी रोडच्या कवेत झवेरी बाजार उभा आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी झगमगणारी दुकाने आणि व्यापाऱ्यांची फुलणारी गर्दी असे चित्र कायम झवेरी बाजारात दिसायचे. करोनाच्या भीतीने मे महिन्यापासून बस, रेल्वेगाडी आणि मिळेल त्या वाहनांनी ७० हजारांहून अधिक कारागीर झवेरी बाजारातून आपल्या गावी परतले आहेत. झवेरी बाजारात बॉम्बस्फोट झाला. पण अवघ्या काही दिवसातच इथले व्यवहार पूर्ववत झाले. पण करोनाच्या दहशतीमुळे झवेरी बाजार गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ सुनासुना आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर काही व्यापारी आणि कर्मचारी झवेरी बाजारात दिसू लागले आहेत. मात्र कारागीर नसल्याने बाजार आजही तसा शांतच आहे.

कोटय़वधींची उलाढाल थांबली..

येथे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांची सुमारे तीन हजार दुकाने आहेत. त्यात २० हजार कर्मचारी काम करतात. तर बाजारातील सात हजार ५०० कारखान्यांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने घडविण्याचे काम अहोरात्र चालायचे. तब्बल एक लाख २५ हजार कारागिरांना त्यातून रोजगार मिळत होता. यातील बहुतांश कारागीर बंगालचे. बारीक कलाकुसर हा त्यांचा हातखंडा. कारखान्यातच त्यांचे वास्तव्य असे. कोटय़वधी रुपयांची उलाढाल या बाजारात होत असे. ती आता थांबली आहे.

मरणकळा येण्याची भीती

गेल्या १५ दिवसांमध्ये अधूनमधून व्यापारी झवेरी बाजारात फेरी मारू लागले आहेत. तारपाटय़ाच्या यंत्रांना आणि अवजारांना चढलेला गंज पाहून व्यापाऱ्यांचे डोळे पाणावतात. उरलेले कारागीरही निघून गेल्यानंतर या बाजाराला मरणकळा येण्याची भीती आहे. त्यामुळे व्यापारी आणि कारखान्यांचे मालक त्यांना थांबवून इथले व्यापारचक्र थोडय़ा प्रमाणात सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. झवेरी बाजारात येणारे काही व्यापारी चोपडय़ांवरील धूळ झकटून हिशेबाचा ताळेबंद जुळवू लागले आहेत. तर काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने कार्यालये, दुकाने आणि कारखान्यांमध्ये झाडलोट सुरू झाली आहे.

व्यापारी हवालदिल..

कारागीर आपल्या गावी निघून गेल्यामुळे उरलेत केवळ सुरक्षा रक्षक आणि अधूनमधून फेऱ्या घालणारे पोलीस. करोनाच्या संसर्गामुळे सुरक्षा रक्षक आणि सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या हवाली सोडून व्यापारी मंडळी घरी बसली होती. पण दुकानात ठेवलेली जोखीम, भरवशाच्या कारागिरांनी सोडलेली साथ यामुळे व्यापारी मंडळी हवालदिल आहेत.

टाळेबंदी उठविल्यानंतर कारागिरांअभावी झवेरी बाजाराला गतवैभव कसे मिळवून द्याायचे हा प्रश्न आहे. सरकारने सराफांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. तरच पुन्हा झवेरी बाजार पूर्वीप्रमाणे झळाळून निघेल.

– अदीप वेर्णेकर, सरचिटणीस, मुंबई सुवर्णकार संघ