Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस
chandigarh doctor grandfather sbi share 500 rupees in 1994 know profit
याला म्हणतात खरी गुंतवणूक! आजोबांनी ३० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ५०० रुपयांच्या शेअरवर नातू झाला लखपती
girl rescued within twelve hours
अपहरण झालेल्या पाच वर्षीय मुलीची बारा तासांत सुटका

नाक्यानाक्यांवर लागलेल्या चायनीजच्या गाडय़ा आणि केशरी रंगात अक्षरश: बुडवल्याने एकसारखे दिसणारे आणि चवीच्या पदार्थामुळे चायनीज खायची खरं तर हिंमतच होत नाही. म्हणूनच गेले अनेक दिवस जिभेला सुखावेल आणि खिशालाही परवडेल अशा जागेच्या शोधात होतो. काही दिवसांपूर्वी ती जागा सापडली. झेन चायनीज – माहिमला सिटीलाइट सिनेमाच्या मागच्या गल्लीत अगदी चार टेबलांचे हे छोटेखानी हॉटेल आहे. हॉटेल जरी लहान असले तरी येथील पदार्थ मात्र एखाद्या उंची रेस्टॉरंटमध्ये अस्सल चायनीज मिळतं त्या चवीचे आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तसंच चायनीज म्हटलं की चिकन हे ठरलेलं; पण हरीश कोटीयन यांनी आठ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘झेन’ची खासियत आहे ती म्हणजे सी-फूड.

चायनीज म्हटलं की सुरुवात ही सूपनेच व्हायला हवी. ‘झेन’च्या मेन्यूची सुरुवातही सूपने होते, पण नेहमीचे मनच्याव, क्लिअर सूप किंवा लंगफंग सूप तुम्हाला अगदी तळाला दिसतील. वरच्या क्रमांकावर आहेत स्पाइसी ऑनियन, सेलेरी वाइन, हॉट पेकिंग, बन्र्ट गार्लिक सूप. प्रत्येक सूपची चव किती आणि कशी वेगळी आहे हे शब्दात सांगणं कठीण आहे, कारण मीच पहिल्यांदा त्या चाखल्या आहेत. त्यामुळे तुम्हीच त्याचा आस्वाद घेतलात तर त्याचं वेगळेपण तुम्हाला कळेल.

स्टार्टरमध्ये झेन क्लासिक प्रॉन्झ, सिंगापूर चिली प्रॉन्झ, पिकल चिली प्रॉन्झ, प्रिक बेसिल प्रॉन्झ हे चायनीजमध्ये न चाखलेले कोलंबीचे विविध प्रकार तुम्हाला येथे खायला मिळतील. प्रॉन्झशिवाय इतर डिशेससाठी बेटकी आणि रावस हे मासे वापरले जातात. त्याचा वापर करून फिश चिली बेसिल, फिश इन ब्लॅक गार्लिक पेप्पर, फिश इन बर्न चिली सॉस हे पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय खेकडा हा पाच वेगवेगळ्या प्रकारच्या सॉसमध्ये तुमच्या फर्माईशीनुसार बनवून मिळतो. इथलं वेगळेपण म्हणजे मेन कोर्समध्ये केवळ राइस आणि नूडल्स हेच पर्याय नाहीएत. तर तुम्हाला व्हेज (पनीर), मासे आणि चिकनच्या ग्रेव्हीचेही भरपूर पर्याय उपलब्ध आहेत जे तुम्ही स्टीम राइस किंवा फ्राइड राइससोबत खाऊ  शकता. खरं तर राइस आणि ग्रेव्ही वेगळी घेऊन आवर्जून खावेत अशाच त्या ग्रेव्ही आहेत, कारण तुम्हाला इतर चायनीज रेस्टॉरंटमध्ये त्या क्वचितच खायला मिळतील. ग्रेव्हीचा विषय निघालाच आहे तर इथली थाई करी ट्राय करायला अजिबात विसरू नका. पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चवीच्या तोडीची थाई करी येथे मिळते, कारण ती बनवण्याची पद्धत आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी या सारख्या आहेत. हरीश यांच्या मते थाई करीमध्ये खूप काही टाकायची आवश्यकता नसते. यामध्ये मीठही टाकलं जात नाही, कारण त्याची गरज फिश सॉस भागवत असतं. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण या करीत साखर टाकली जाते. शिवाय क्रीमऐवजी नारळाचं दूध वापरलं तर ते या करीची लज्जत वाढवण्यात मदत करत असतं. त्यामुळे ‘झेन’मध्ये थाई करी खाल्लात तर इतर चायनीज करीला तुम्ही हातही लावणार नाहीत, असा हरीश यांचा दावा आहे. थाई करीसोबत बर्मिज चिकन करीसुद्धा हटके आहे.

मासे ही जरी ‘झेन’ची खासियत असली तरी चिकनला अजिबात अडगळीत टाकलेलं नाही. प्रिक गाई हे चिकन स्टार्टर कदाचित तुम्हाला इथेच खायला मिळेल. त्यासाठी चिकन एक दिवस अगोदर मॅरीनेट करून ठेवावं लागतं. ऑर्डर आल्यावर बनताना त्यामध्ये ‘झेन’ स्पेशल सॉस टाकून फक्त तव्यावर फ्राय करून दिलं जातं. अजिनोमोटो किंवा साधं मीठदेखील त्यात टाकलं जात नाही; पण आपली पैज आहे, चिकन संपल्यावर प्लेटमध्ये राहिलेला सॉस तुम्ही बोटाने चाखून संपवाल. इथल्या पदार्थामध्ये वापरले जाणारे सॉस विकत न आणता किचनमध्येच तयार केले जातात.

व्हेज स्टार्टरमधील सेजवान चिली बेबीकॉर्न आणि क्रंची वॉटर चेस्टनट अँड कॉर्न इन हम्ॉईसिन सॉस या दोन डिशची निर्मिती ‘झेन’ची आहे. सोयबिन डम्पलिंग इन टोमॅटो सॉस हेदेखील आवर्जून खाण्यासारखं आहे.

इंडियन फूड बनवताना मसाले आणि ग्रेव्ही तयार करून ठेवाव्या लागतात आणि त्याचा वापर झाला नाही की ते वाया जातं; परंतु चायनीज पदार्थाच्या बाबतीत असं नसतं. फारशी तयारी करून ठेवावी लागत नाही आणि ऑर्डर आली की पदार्थ बनवले जातात. म्हणूनच हरीश यांनी हॉटेल सुरू करताना चायनीजची निवड केली. दादर केटरिंग कॉलेजमधून हॉटेल आणि केटरिंग मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वडिलांच्या केटरिंगच्या व्यवसायात लक्ष घातलं आणि उमेदीच्या काळात थेट आमदार निवासच्या किचनची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. त्यानंतर दररोज जेवणाचे तीनशे-साडेतीनशे डबे बनवण्याचंही काम केलं. या सगळ्यातून भरपूर शिकून ‘झेन’च्या माध्यमातून अस्सल चवीचं चायनीज खवय्यांपर्यंत पोहोचवण्याचा हरीश यांचा प्रयत्न सुरू आहे.

एखादा पदार्थ चांगला आहे की वाईट हे ठरविण्यासाठी संपूर्ण डिश फस्त करण्याची आवश्यकता नसते. पहिल्या घासातच तो अंदाज येऊ  शकतो. ‘झेन’ चायनीजमध्ये तुम्हाला हाच अनुभव येईल. खरं तर सोप्या गोष्टी बनवणं जास्त कठीण असतं. ‘झेन’चे पदार्थ सोपे आणि ओरिजनल आहेत. त्यामुळे तुम्ही चायनीजचे चाहते असाल तर एकदा तरी ‘झेन’ची वारी करायलाच हवी.

झेन – चायनीज कुझिन

  • कुठे – १५, ए-१, वकील बिल्डिंग, राव वाडी, गोपीटँक रोड, सिटीलाइट सिनेमाच्या मागे, माहिम, मुंबई-४०००१६.
  • कधी – मंगळवार ते रविवार दुपारी १२ ते ३ व संध्या. ७ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत. सोमवार बंद.

nanawareprashant@gmail.com

@nprashant