News Flash

कुठे भाजप-काँग्रेस, तर कुठे शिवसेना-राष्ट्रवादी!

स्थानिक पातळीवरील सत्तेसाठी राजकीय अभिनिवेश दूर ठेवत वेगवेगळी समीकरणे सोमवारी तयार झाली.

जिल्हा परिषदांच्या सत्तेसाठी नवी समीकरणे

‘काँग्रेसमुक्त भारत’चा भाजपने केलेला निर्धार तर भाजपला रोखण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट असले तरी गोंदिया जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पातळीवरील प्रतिस्पर्धी एकत्र आले. तर ठाणे जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाली. स्थानिक पातळीवरील सत्तेसाठी राजकीय अभिनिवेश दूर ठेवत वेगवेगळी समीकरणे सोमवारी तयार झाली. भाजप व काँग्रेसच्या युतीवरून लगेचच राष्ट्रवादीने प्रश्नचिन्ह उपस्थित करीत काँग्रेसला भाजप की राष्ट्रवादी अधिक जवळचा हे स्पष्ट करावे, असे आव्हान दिले.

गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक २० सदस्य असून, काँग्रेस १७ तर भाजपचे १६ सदस्य आहेत. काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत एकत्र येण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शविली होती. पण काँग्रेस आणि भाजपची युती होऊन जिल्हा परिषद अध्यक्षपद काँग्रेसला तर उपाध्यक्षपद भाजपला मिळाले. गोंदियामध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेस नेते गोपाळ अगरवाल यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यातूनच अगरवाल यांनी राष्ट्रवादीला बरोबर घेण्यास नकार दिला. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना राष्ट्रवादीपेक्षा भाजपचा पर्याय अधिक जवळचा वाटला. परिणामी काँग्रेस आणि भाजप एकत्र आले. गेले अडीच वर्षे काँग्रेस आणि भाजपशी युती होती व तशीच व्यवस्था कायम राहिली. काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची तयारी होती. गेले चार दिवस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या संपर्कात होतो. त्यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. विखे-पाटील यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा भाजप अधिक जवळचा वाटला असेल, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. यवतमाळ जिल्हा परिषदेतही गेल्या वर्षी शिवसेनेला रोखण्याकरिता काँग्रेस व भाजपची आघाडी झाली होती. विदर्भातील दोन जिल्हा परिषदांमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र सत्तेत आहेत.

ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीची युती

ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला रोखण्याकरिता  शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये समझोता झाला होता. दोन्ही पक्षांनी परस्परांना मदत केली होती. सत्तेसाठी शिवसेनेकडे फक्त एक मत कमी होते. शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला शह देण्याकरिता राष्ट्रवादीशी युती केली. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा अध्यक्ष तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आले. ठाणे जिल्ह्य़ात भाजपला रोखणे हे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे समान उद्दिष्ट होते. त्यातूनच हे दोन्ही पक्ष एकत्र आले.

काँग्रेसला भाजप अधिक जवळचा असावा – तटकरे

भाजपबरोबरील संबंधांबाबत आम्हाला काँग्रेसचे नेते नेहमी दोष देतात किंवा टीका करतात. पण गोंदिया जिल्हा परिषदेत आम्ही आघाडी करण्याची किंवा कोणतेही पद स्वीकारण्याची तयारी दर्शवूनही काँग्रेसने भाजपबरोबर हातमिळवणी केली. यावरून काँग्रेसला भाजप अधिक जवळचा वाटला असेल, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी केली. भाजपला रोखण्याकरिता राष्ट्रीय पातळीवर निधर्मवादी पक्षांशी आघाडी करावी, अशी चर्चा केली जाते. पण महाराष्ट्रात काँग्रेसची कृती मात्र विरोधी दिसते, असेही मत तटकरे यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 4:25 am

Web Title: zilla parishad election bjp congress shiv sena ncp
Next Stories
1 कमला मिल दुर्घटना अंतर्मुख करणारी
2 मेट्रोच्या डब्यांसाठी ‘मेक इन इंडिया’चा अट्टहास!
3 राज्यातील बालगुन्हेगारीत वाढ
Just Now!
X