ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत पक्की घरे मिळवून देण्याचे आश्वासन देत सुमारे ८०० हून अधिक रहिवाशांकडून कोटय़वधी रुपयांची रक्कम जमा करणाऱ्या एका तथाकथित समाजिक संस्थेला ठाणे महापालिकेने नोटीस बजाविल्याने येथील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे पैसे गोळा करताना महापालिकेचे नाव आणि बोधचिन्हाचा वापर झाल्याचे सकृद्दर्शनी पुराव्यावरून स्पष्ट होत आहे. वर्तकनगर भागातील मेसर्स व्ही.आर.पी. असोसिएशन चॅरिटेबल ट्रस्ट असे या संस्थेचे नाव असून या संस्थेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.
ठाण्यातील काही बडय़ा राजकीय नेत्यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याची चर्चा रंगली असून या सामाजिक संस्थेचा आश्रयदाता कोण, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. वर्तकनगर भागातील साईनाथ नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्यांना पक्की घरे देण्याचे आश्वासन या संस्थेमार्फत देण्यात आले होते. त्यासाठी या भागातील सुमारे ८४५ रहिवाशांकडून सुमारे दोन कोटी ४० लाख रुपये जमा करण्यात आले होते. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील लाभार्थी निवडताना त्यांचे सर्वेक्षण करण्याचा पूर्ण अधिकार महापालिकेचा असतो. त्यामुळे एखाद्या सामाजिक संस्थेने अशा प्रकारे सर्वेक्षण करणे धक्कादायक होते. या प्रकरणी वर्तकनगर परिसरातील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी आयुक्त असीम गुप्ता यांच्याकडे तक्रार केली होती. चव्हाण यांच्या तक्रारीच्या आधारे आयुक्तांनी महापालिकेच्या समाज विकास विभागास चौकशीचे आदेश दिले होते. समाज विकास विभागाने या प्रकरणी संबंधित संस्थेला बाजू मांडण्याची संधी दिली होती. या चौकशीदरम्यान संबंधित संस्थेने पैसे गोळा केल्याचे मान्य केले असले तरी यापैकी एक कोटी ६५ हजार रुपयांच्या मुदत ठेवी झोपडपट्टीधारकांच्या नावे केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील लाभार्थी ठरविताना घोळ झाल्याच्या तक्रारी यापूर्वीही पुढे आल्या असून वर्तकनगर परिसरातील या घटनेमुळे या प्रक्रियेतील सावळागोंधळ पुन्हा उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित संस्थेवर गुन्हा का दाखल करू नये, अशा स्वरूपाची कारणे दाखवा नोटीस महापालिकेने संस्थेस बजावली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.