मुंबई : आर्थिक गुन्ह्यांमुळे केवळ देशाच्या आर्थिक व्यवस्थेलाच धक्का पोहोचत नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेवरील नागरिकांच्या विश्वासालाही तडा जातो. याचिकाकर्त्यां या अशाच गंभीर गुन्ह्यांतील आरोपी असल्याने त्यांना दिलासा दिला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची पत्नी बिंदू, मुली राधा व रोशनी यांची जामीन याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. न्या. भारती डांगरे यांनी मंगळवारी तिघींची याचिका फेटाळत त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. येस बँकेचे समूह अध्यक्ष आणि व्यावसायिक प्रमुख राजीव आनंद यांची जामीन याचिकाही न्यायालयाने फेटाळली. याचिकाकर्त्यां या जामिनासाठी पात्र नाहीत. राज्याच्या आर्थिक व्यवस्थेला धक्का पोहोचवणाऱ्या गुन्ह्यांत याचिकाकर्त्यांचा सहभाग आहे. नागरिकांची फसवणूक झाली आहे. असे गुन्हे वारंवार व मोठय़ा प्रमाणात घडत असून त्यामुळे देशाची प्रगती खुंटली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे, असेही न्यायालयाने तिघींची याचिका फेटाळाना नमूद केले.