‪जोरदार शक्तिप्रदर्शन करत कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माणिकराव ठाकरे आणि कॉंग्रेस व स्वाभिमानी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सोमवारी सेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करताना अशाच प्रकारे शक्तिप्रदर्शन केले होते. दरम्यान, एमआयएमनेही उमेदवार उभा करण्याचा निर्णय  घेतल्याने ही निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे.
पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ‘मातोश्री’च्या अंगणात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना सामना रंगणार आहे. राणे यांनी शिवसेनेचा पराभव केल्यास शिवसेनेला ते फारच जिव्हारी लागणार आहे. यामुळेच शिवसेनेने सारी शक्ती पणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे. सेना आणि राणे  पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरत आहेत. मुंबई काँग्रेसने राणे यांच्या मागे ताकद उभी करण्यावर भर दिला आहे. यामुळे राणे विरुद्ध शिवसेना हा पोटनिवडणुकीचा दुसरा अंक चुरशीचा ठरणार आहे.