महायज्ञाद्वारे विद्यार्थ्यांवर धर्मसंस्काराचा अजब सोहळा

पुण्यातील ‘अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठा’तील प्रकार

पुण्यातील ‘अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठा’तील प्रकार

मुंबई :  ‘द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी’ अशी ओळख सांगणाऱ्या पुण्यातील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठात व्यवस्थापन, विधि आणि इतर व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम राबविले जातात. मात्र या अभ्यासासह विद्यार्थ्यांवर धर्मसंस्कार बिंबविण्याचा अजब सोहळा सध्या संस्थेत सुरू आहे.  ‘तरुणांचे पुनरूज्जीवन’ या नावाखाली तब्बल दहा दिवसांचा ‘अती रुद्र महायज्ञ’ करण्यात येत असून त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन आणि वातावरणाचे शुद्धीकरण घडून विद्यार्थ्यांभोवती दैवी शक्तीचे सुरक्षा कवच तयार होईल, असा दावा या संस्थेने केला आहे.

शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक कार्यक्रम असावेत का यावरून अनेक नामांकित संस्थांमध्ये यावरून वाद सुरू असताना विद्यार्थी धार्मिक व्हावेत यासाठी संस्थेने महायज्ञ सुरू केला आहे.  रोजच्या तासिकांच्या वेळात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते सायं ६ वाजेपर्यंत हा सोहळा संस्थेत होणार आहे.

‘सर्वाना शिवाची शक्ती मिळावी. दैवी शक्तीचे सुरक्षा कवच तयार व्हावे. तरुणांचे पुनरुज्जीवन व्हावे. विद्यार्थ्यांना वैदिक संस्कृतीची वैज्ञानिक ओळख व्हावी. वातावरण आनंदी व्हावे. यज्ञाद्वारे पर्यावरणाचे संतुलन राखले जावे आणि त्याआधारे वातावरण शुद्ध व्हावे. जेणेकरून मानवतेचे कल्याण होईल,’ असे या यज्ञामागील उद्दिष्ट असल्याचे संस्थेने पत्रकाद्वारे नमूद केले आहे.

संस्था म्हणते..

शिक्षणसंस्थेत धार्मिक गोष्टी का असाव्यात? श्रद्धा किंवा धर्म ही वैयक्तिक बाब नाही का, असे विचारले असता  ‘सध्याच्या काळात फक्त विज्ञान माहीत असून चालणारे नाही. वैदिकशास्त्राचे ज्ञानही आवश्यक आहे. अती रुद्राचे खूप फायदे आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी त्याचा खूप फायदा होतो. विशेषत: या यज्ञातून बाहेर येणाऱ्या धुरामुळे परिसर शुद्ध होतो. सकारात्मक उर्जा पसरते. हे सर्व विद्यार्थ्यांना माहित असणे आवश्यक आहे.’ असे उत्तर मिळाले.

प्रकार काय?

राज्यातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये सध्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांच्या आयोजनाची लगबग सुरू आहे. मात्र, पुण्याच्या अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी मात्र संस्थेला दैवी शक्तींचे संरक्षण मिळावे यासाठी यज्ञसोहळा यशस्वी करण्यात गुंतले आहेत. चऱ्होली येथील शिक्षण संकुलाच्या मैदानावर बुधवारपासून मंत्रघोष घुमत आहे. दहा दिवस संस्थेच्या आवारात हा महायज्ञ होणार आहे.

नेत्यांची हजेरी

या महायज्ञाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. गुरूवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याठिकाणी हजेरी लावली. यानंतरही अनेक नेते येथे येणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील या महायज्ञाला हजेरी लावणार असल्याचे डॉ. खेडकर यांनी सांगितले.

‘विद्यार्थी धार्मिक व्हायला हवेत’

शिक्षण संस्थेने महायज्ञ आयोजित करण्याचे कारण काय, असे विचारले असता  संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर यांनी सांगितले,‘संस्थेच्या परिसराबरोबरच पुणे शहरात वातावरणाचे शुद्धीकरण व्हावे. विद्यार्थ्यांना विज्ञान आणि वैदिक ज्ञानाचा मेळ घालता यावा. चांगले संस्कार व्हावेत. आताची पिढी ही आधुनिकीकरणामुळे धार्मिकतेकडे वळत नाहीत. मात्र धार्मिकतेची जोड आवश्यक असते. त्यामुळे प्रत्यक्ष सर्व पाहून विद्यार्थ्यांना धार्मिक आणि वैदिक गोष्टींचे महत्व कळावे यासाठी हा महायज्ञ करण्यात येत आहे.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 10 days ati rudra mahayagya in dy patil university zws

ताज्या बातम्या