मुंबई : दरवर्षी शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात हजारो रुग्ण उपचार घेतात. या रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवडी क्षयरोग रुग्णालयात अत्याधुनिक अशा १० नवीन अतिदक्षता खाटा (आयसीयू बेड) उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचा क्षयरोग रुग्णांना फायदा होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या क्षयरोग रुग्णालयात क्षयग्रस्त अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. मुंबईसह राज्यभरातून रुग्ण येथे उपचारासाठी येतात. या रुग्णांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य सेवा सुधारण्यावर महापालिकेने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षयरोग रुग्णालयात १० अतिदक्षता खाटा (आयसीयू बेड) सज्ज करण्यात आल्या आहेत. क्षयरोग नसलेल्या रुग्णांवरही येथे उपचार करणे शक्य होणार आहे. तसेच लहान मुलांसाठी अतिदक्षता खाटांचा उपयोग होऊ शकतो. सर्व रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.