मुंबई : जोरदार पाऊस अद्याप झाला नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पाणीसाठा अपुरा झाला आहे. त्यामुळे सोमवार, २७ जूनपासून संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ठाणे, भिवंडी महानगरपालिकेसह इतर गावांना मुंबई पालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठय़ामध्येही १० टक्के कपात केली जाणार आहे.

जून महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा सुमारे ७० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.  मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत शुक्रवारपर्यत या सर्व सात जलाशयांमध्ये मिळून फक्त १ लाख ४१ हजार ३८७ दशलक्ष लिटर म्हणजे ९.७७ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच दिवशी हा जलसाठा १५.५४ टक्के इतका होता.

पावसाची हीच परिस्थिती यापुढेही सुरू राहिल्यास मुंबईच्या पाणीपुरवठय़ावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दमदार पाऊस होऊन  जलसाठय़ाची स्थिती सुधरेपर्यत मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सोमवारपासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे.