आधुनिक मोटारींचे विलोभनीय दर्शन

‘गेल्या दोन वर्षांपासून श्रेष्ठ दर्जाच्या आधुनिक मोटारी युवक आणि वयस्करांना खूप आवडत आहेत.

मुंबई : देशातील पहिल्या श्रेष्ठ दर्जाच्या आधुनिक ४० मोटारींच्या ताफ्याची झलक याचि डोळा पाहण्यासाठी रविवारी वांद्रे-कुर्ला संकुलात उत्साही आणि हौशी मोटारप्रेमींनी गर्दी केली होती.

देशातील या पहिल्या ‘मॉडर्न क्लासिक कार रॅली’मध्ये १० ते ३० वर्षे जुन्या म्हणजे १९७० ते २००० या कालावधीत उत्पादित श्रेष्ठ दर्जाच्या मोटारी सहभागी झाल्या होत्या. श्रेष्ठ दर्जाच्या मोटारींचा हा ताफा वांद्रे-वरळी सी-लिंकवरून मार्गस्थ होऊन वांद्रे-कुर्ला संकुलातील सोफीटेल हॉटेलकडे परतला. या ‘मॉडर्न क्लासिक कार रॅली’त जग्वार ई-टाइप, बीएमडब्ल्यू ई३० (या मोटारी कधीकाळी कला आणि मोटारस्पोर्टप्रेमी जहांगीर निकोलसन यांच्या मालकीच्या होत्या.) यांच्यासह मर्सिडीस- बेन्झ एसएलएस, पॉन्टियाक फायरबर्ड्स आणि होंडा एनएसएक्स या मोटारी सहभागी झाल्या होत्या.

श्रेष्ठ दर्जाच्या आधुनिक मोटारींसाठी प्रामुख्याने असा उपक्रम राबवल्याबद्दल ‘मॉडर्न क्लासिक कार रॅली’त सहभागी झालेल्या मोटारप्रेमींनी समाधान व्यक्त केले. यशवर्धन रुईया हे आपल्या सहा वर्षांचा मुलगा रेयांश याच्यासह सहभागी झाले होते. ते म्हणाले, आम्ही नेहमीच व्हिन्टेज कार रॅलीत सहभागी होतो, परंतु आधुनिक मोटारींच्या कार रॅलीत सहभागी होण्याची संधी आम्हाला प्रथमच मिळाली. रुईया १९९४च्या होंडा बीट मोटारीसह सहभागी झाले होते. श्रेष्ठ दर्जाच्या आधुनिक मोटारी भारतातही लोकप्रियता मिळवत असल्याचे मोटारप्रेमींनी सांगितले. जतीन पटेल १९७८च्या पॉन्टियाक फायरबर्ड मोटारीसह सहभागी झाले होते. त्यांनी अशा प्रकारच्या आणखी कार रॅली आयोजित करण्याची गरज व्यक्त केली. पटेल म्हणाले, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून श्रेष्ठ दर्जाच्या आधुनिक मोटारी युवक आणि वयस्करांना खूप आवडत आहेत. या मोटारी जुन्या आणि नव्या अभियांत्रिकीच्या अभिकल्पाचे मिश्रण आहे.’’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 10 to 30 years old best car participate in modern classic car rally zws

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या