मुंबई: वरळी येथे राहणाऱ्या रिदम ममानिया या दहा वर्षांच्या मुलीने एव्हरेस्ट शिखराच्या पायथ्यापर्यंत जाणारा बेस कॅम्प ट्रेक ६ मे रोजी यशस्वीरीत्या केला आहे. एव्हरेस्ट पर्वताच्या पायथ्यापर्यंतचा ट्रेक करणाऱ्या काही मोजक्या बालकांमध्ये रिदमच्या नावाचाही समावेश झाला असून ११ दिवसांमध्ये तिने हा प्रवास पूर्ण केला आहे. रिदम ही वांद्र्याच्या एमईटी ऋषीकुल विद्यालयातील पाचवीची विद्यार्थिनी आहे. तिने पहिला मोठा ट्रेक दूधसागर येथे २१ किलोमीटरचा केला आहे. रिदमने सह्याद्रीच्या रांगेतील माहुली, सोंडाई, कर्नाळा आणि लोहगड या ठिकाणीही ट्रेक केले आहेत. एव्हरेस्टच्या पायथ्यापर्यंतचा ट्रेक हा पाच हजार ३६४ मीटरचा आहे. हा ट्रेक ११ दिवसात पूर्ण करून रिदम ६ मेला दुपारी एक वाजता बेस कॅम्पला पोहोचली. ट्रेकमध्ये दरदिवशी आठ ते नऊ तास पदभ्रमंती केली आहे. विविध वातावरणाच्या स्थितीमध्ये, वेगवेगळय़ा चढ उतार तिने या काळात अनुभवले. अगदी उणे दहा अंश डिग्री सेल्सियसमध्येही तापमानातही तिने हा ट्रेक केला आहे. या प्रवासात तिच्याबरोबर तिचे आई वडील उर्मी आणि हर्षलही होते.