२७ मार्चला सांगलीत उद्घाटन; १४ जूनला मुंबईत समारोप

मुंबई : शंभराव्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाच्या निमित्ताने मराठी नाटक गावागावांत पोहोचवण्याचा ‘अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदे’चा मानस आहे. २७ मार्चला जागतिक रंगभूमीदिनी सांगलीत संगीत नाटकाने नाटय़संमेलनाचे उद्घाटन होऊन १४ जूनला मुंबईत त्याचा समारोप होईल. मधल्या काळात राज्यभर स्थानिक पातळीवर संमेलन घेतले जाणार आहे.

मराठीतील आद्य नाटककार व्यंकोजी राजे यांना २५ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तंजावर येथे अभिवादन करून नाटय़संमेलनाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर २६ मार्चला सांगलीत नाटय़दिंडी निघेल. २७ मार्चला संगीत नाटकाने नाटय़संमेलनाचे उद्घाटन होईल. सांगलीतील संमेलन २९ मार्चपर्यंत चालेल. ३० मार्च ते ७ जून या काळात राज्याच्या विविध भागांत नाटय़संमेलन होईल. यात स्थानिक कलाकार आणि नाटय़प्रेमी मंडळींचा अधिकाधिक सहभाग असावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. स्थानिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट एकांकिका, बालनाटय़, प्रायोगिक नाटके, इत्यादींना यानिमित्ताने व्यासपीठ उपलब्ध होईल. त्यातील सर्वोत्कृष्ट सादरीकरणे मुंबईतील समारोप सोहळ्यातही सादर होतील.

मुंबईत ८ ते १४ जूनदरम्यान रंगणाऱ्या समारोप सोहळ्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटकांचे सादरीकरण होणार आहे. त्याचबरोबर एकपात्री, एकांकिका, बालनाटय़, लोककला, दीर्घाक असे नाटकाचे विविधांगी दर्शन घडवले जाणार आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्तही काही कार्यक्रम होतील. तसेच काही चर्चासत्रांचेही आयोजन केले जाणार आहे. नाटय़संमेलनाचे उत्कृष्ट आयोजन करण्यासाठी नाटय़परिषदेच्या शाखांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत.

शंभरावे नाटय़संमेलन खऱ्या अर्थाने अखिल भारतीय व्हावे यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर ज्या ठिकाणी मराठी नाटक सुरू आहे तेथेही नाटय़संमेलने घेतली जाणार आहेत. मात्र ही संमेलने मुख्य संमेलनाच्या समारोपानंतर होतील. यात बेळगाव, बडोदा, गोवा, इंदूर, इत्यादी ठिकाणांचा समावेश असेल.