मुंबई : ‘वर्सोवा – अंधेरी – घाटकोपर मेट्रो १’मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येने १३ ऑगस्ट रोजी पाच लाखांचा टप्पा पार केला. गेल्या १० वर्षांमध्ये ‘मेट्रो १’ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांची संख्या १०० कोटींच्या घरात पोहोचली आहे.
मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका अशी ओळख असलेली ‘मेट्रो १’ मार्गिका २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली आहे. या मेट्रो मार्गिकेला सुरुवातीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. या मार्गिकेची मालकी, देखभाल – संचलनाची जबाबदारी असलेल्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) प्रवाशांचा प्रसिसाद वाढावा यासाठी विविध प्रयत्न केले. अनेक सुविधा विकसित केल्या. ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिका सेवेत दाखल झाल्या. या मार्गिका ‘मेट्रो १’शी जोडण्यात आल्या. या सर्वांचा परिणाम म्हणून मागील काही महिन्यांपूर्वी प्रवासी संख्या वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच आता ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या साडेचार लाख ते पावणेपाच लाखांच्या घरात पोहोचली. १३ ऑगस्ट रोजी दैनंदिन प्रवाशी संख्येने ५ लाखांचा टप्पा पार केला. ‘मेट्रो १’मधून १३ ऑगस्ट रोजी पाच लाख ३८५ प्रवाशांनी प्रवास केला. ही आतापर्यंतची दुसरी दैनंदिन विक्रमी प्रवासी संख्या होती.
हेही वाचा >>>आपलं सरकार सेवा केंद्रात कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप : रत्नागिरीतील १६, तर चिपळूणमधील २९ सेवाकेंद्र बंद
‘मेट्रो १’ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या वाढत असून आता या मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या एकूण प्रवासी संख्येतही वाढ होण्यास मदत झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘मेट्रो १’ मार्गिका सेवेत दाखल होऊन १० वर्षे पूर्ण होत असताना या मार्गिकेवरील एकूण प्रवासी संख्येने ९७ कोटींचा टप्पा गाठला होता. आता अडीच महिन्यांतच एकूण प्रवासी संख्येने १०० कोटींचा टप्पा पार केल्याची माहिती एमएमओपीएलकडून देण्यात आली.