निशांत सरवणकर

पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश

माथाडी कामगार आणि सुरक्षारक्षकांच्या कल्याणाची जबाबदारी असलेल्या वेगवेगळ्या कामगार मंडळांच्या मुदत ठेवींचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. तूर्तास तीन मंडळांतील १०० कोटींच्या अपहारप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी तपास पुढे सरकू शकलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

असंघटित कामगारांना संरक्षण मिळावे यासाठी माथाडी कायद्यातील तरतुदींनुसार विविध मंडळांकडून या कामगारांना प्रत्येक महिन्याला मजुरी दिल्यानंतर भविष्य निर्वाह निधी, उपदान आणि कल्याणकारी योजनांसाठी असलेला निधी या मंडळांकडे जमा होतो. हा निधी नियमानुसार राष्ट्रीयकृत बँकेत ठेवला जातो. रेल्वे गुडस् क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट मंडळ, मुंबई लोखंड व पोलाद कामगार मंडळ आणि धातू व कागद बाजार मंडळ या तीन मंडळांतील सुमारे १०० कोटी रुपयांच्या मुदत ठेवींतील रक्कम परस्पर काढली गेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र तपासात काहीही प्रगती झालेली नाही वा ही रक्कमही वसूल झालेली नाही. या अपहारात बँकेचे अधिकारी गुंतले असल्याचा आरोप केला जात असला तरी मंडळातील संबंधितांच्या संगनमताशिवाय ते शक्य नसल्याचे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

रेल्वे गुडस् क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट मंडळाने अनुक्रमे २४ आणि तीन कोटी रुपये मुदत ठेवींच्या स्वरुपात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोपरखैरणे शाखेत आणि चार बंगला, अंधेरी येथील शाखेत गुंतविले होते. मुंबई लोखंड व पोलाद कामगार मंडळाने पनवेलच्या आंध्र बँकेत अडीच कोटी तर बँक ऑफ बडोदाच्या कल्याण येथील खडकपाडा शाखेत सात कोटी आणि स्टेट बँकेच्या माझगाव येथील शाखेत ४५ कोटी रुपयांची मुदत ठेव ठेवली होती. धातू व कागद बाजार मंडळाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अंधेरी शाखेत २० कोटी रुपये गुंतविले आहेत. या सर्व मुदतठेवींची रक्कम परस्पर त्रयस्थ व्यक्तीने काढून घेतली आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी असे पत्र गृहविभागाचे कक्ष अधिकारी दि. ज. शेडमेखे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक तसेच मुंबई, ठाणे व नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पाठविले होते. त्यानंतरही तपास झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तीन मंडळांच्या निधीचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लगेच गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलिसांनी तपास करून अपहार करणाऱ्यांना शोधून काढले पाहिजे. म्हणजे आम्हालाही पुढील कारवाई करणे शक्य होईल.

– राजीव जाधव, कामगार आयुक्त