मुंबई : राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत मुंबईतील २६ प्रभागांमध्ये ७ डिसेंबर २०२४ पासून २४ मार्च २०२५ पर्यंत ‘१०० दिवस मोहीम’ राबवण्यात येणार आहे. क्षयरोग रुग्ण शोधण्याची गती वाढविणे, क्षयरोगाचा मृत्यू दर कमी करणे, क्षयरोगाचा प्रसार कमी करून नवीन क्षयरुग्ण टाळणे हे मोहिमेचे उद्दिष्ट असणार आहे.
भारत सरकारने २०२५ अखेर देशातून क्षयरोगाचे निर्मूलन करण्याचे ध्येय ठेवले. त्याअनुषंगाने केंद्रीय क्षयरोग विभागाच्या सूचनेनुसार संपूर्ण भारतात आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबईतील २६ प्रभागांमध्ये ७ डिसेंबर २०२४ पासून २४ मार्च २०२५ पर्यंत “१०० दिवस मोहीम” राबवण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सर्व प्रभागांच्या अधिकाऱ्यांचे दृकश्राव्य प्रणालीद्वारे संवेदीकरण करण्यात आले. यामध्ये २०० पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होता. सर्व संबंधित प्रभागांना मोहिमेबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच संबंधितांना प्रभागस्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. ७ डिसेंबर २०२४ रोजी मार्गदर्शक सूचनेनुसार मोहिमेचा प्रभाग स्तरावर शुभारंभ करण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान विभागनिहाय अतिजोखमीच्या लोकसंख्येचे आणि क्षयरुग्णांचे मॅपिंग करण्यात येणार आहे, अतिजोखमीच्या व्यक्तींची नॅट व ‘एक्स रे’च्या मदतीने क्षयरोगासाठी तपासणी करण्यात येईल. तसेच क्षयरोग निदान झालेल्या व्यक्तींवर त्वरित व योग्य उपचार करण्यात येणार आहेत. क्षयरोग निदान झालेल्या व्यक्तींना पोषणासाठी निक्षय पोषण योजनेचा लाभ तसेच निक्षय मित्र बनवून पोषणासाठी सहाय्य देण्यात येईल. तसेच, क्षयरोग नसलेल्या परंतु क्षयरुग्णाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना क्षयरोग प्रतिबंधित उपचार देण्यात येणार आहेत.
जनभागीदारीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ या कालावधीत निक्षय शिबिर, विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांद्वारे शाळा व महाविद्यालयांमधील युवकांचा सहभाग, निक्षय सप्ताहाचे आयोजन, निक्षय प्रतिज्ञेचे वाचन तसेच विविध उत्सवादरम्यान क्षयरोगाबद्दलची जनजागृती जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या पथकाद्वारे करण्यात येणार आहे.
हेही वाचा – ६८ तास अभ्यास करून विद्यार्थ्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली
ही मोहीम “जन भागीदारितून“ यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाव्यतिरिक्त, इतर विभाग, वैद्यकीय महाविद्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, खासगी उद्योग उपक्रम, नागरी संस्था, स्वयं-सहाय्य गट, सहकारी आणि इतर समुदाय स्तरावरील संघटना यांनी सक्रिय आणि सहयोगी सहभाग घेण्यासाठी आवाहन मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.
जन भागीदारीसाठी आवाहन
अति जोखमीच्या लोकसंख्येमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेही, एच.आय.व्ही. धूम्रपान करणारे, कुपोषित व्यक्ती, क्षयरुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती, कर्करोग रुग्ण यांचा समावेश होतो. तसेच दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, ताप, रात्री घाम येणे, छातीत दुखणे, थकवा येणे, वजन कमी होणे, शरीराच्या कोणत्याही भागात गाठ येणे, नुकतेच शारीरिक बदल, बेडक्यामध्ये रक्त येणे, जुना आजार यापैकी कोणतेही लक्षण आढळल्यास जवळच्या परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात किंवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे उपलब्ध सार्वजनिक आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा.