राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरल्यात जमा आहे. परिणामी निर्बंध शिथिल करण्यात आले असून, विविध सेवा सुरू करण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवेबरोबर आता दोन लसीचे डोस घेतलेल्या लोकांनाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत मुंबई आणि परिसरातून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात तर एकूण लोकल प्रवासी संख्येपेक्षा 80 टक्के प्रवासी पुन्हा लोकलने प्रवास करत असल्याचं रेल्वेने नोंदवलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन्स बाबत आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. पश्चिम रेल्वकडून परिपत्रक काढून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.
लोकल ट्रेन्समधील प्रवाशांचा वाढता ओघ लक्षात घेता, आता २८ ऑक्टोबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून मुंबई विभागात उपनगरीय रेल्वे सेवा पूर्वीप्रमाणेच म्हणजेच १०० टक्के क्षमतेने सुरू केली जाणार आहे.
मागील वर्षी करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये सुरू झालेल्या लॉकडाउनमध्ये लोकल सेवा पूर्णपणे खंडीत करण्यात आली होती. त्यानंतर करोना संसर्गाचे प्रमाण कमी कमी होऊ लागल्यावर अनलॉक प्रक्रीयेदरम्यान लोकल सेवा टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरु करण्यात आली. आता ही लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरु होत आहे.