मुंबई: राज्यातील विविध आश्रम शाळेतील तब्बल १०० विद्यार्थी लवकच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या सफरीवर जाणार आहेत. विज्ञान प्रेरणा अभियानात चांगली कामगिरी करणाऱ्या अशा विद्यार्थ्यांसाठी १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान या सहलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.
ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी जिज्ञासा, संशोधनाची वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून त्या संधीं ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी सरकारने विशेष उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमासाठी आश्रमशाळांमधून गुणवत्ता परीक्षेद्वारे १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
या विद्यार्थ्यांना इस्रो येथे भेट देऊन उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण तंत्रज्ञान, प्रत्यक्ष रॅाकेटचे प्रक्षेपण पाहणे आणि अंतराळ संशोधन प्रकल्पांविषयी प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच विज्ञानविषयक कार्यशाळा आणि शास्त्रज्ञांशी, तज्ज्ञांशी संवादाच्या माध्यमातून त्यांना अनुभवाधारित शिक्षणाचा लाभ होणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संस्थांशी जोडणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि उच्च शिक्षणाच्या संधींबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले.
या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांचा प्रवास विमानाने होणार असून त्यांच्या सुरक्षित व सुसूत्र प्रवासाची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट दर्जाची निवास व्यवस्था करण्यात आली असून दररोज आवश्यक सर्व सुविधा व साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असून असा उपक्रम विभागामार्फत पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. या सहलीसाठी राज्यातील ९८० आश्रमशाळांमधून इयत्ता ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता परीक्षा घेऊन त्यातून ५० विद्यार्थी व ५० विद्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे.
सहलीदरम्यान विद्यार्थी पुणे, बंगळुरू, थिरूअंनतपूरम, कन्याकुमारी या शहरातील विविध ठिकाणांना भेटी देणार आहेत.
