scorecardresearch

Premium

मुंबईत १०४ ते १०७ टक्के पर्जन्यमान

राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली असली तरी मुंबई मात्र सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

rain in Mumbai
मुंबईत १०४ ते १०७ टक्के पर्जन्यमान (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली असली तरी मुंबई मात्र सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ ऑक्टोबरपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रावर वार्षिक सरासरीच्या १०४ टक्के तर सांताक्रूझ केंद्रावर १०७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यंदा चार महिन्यांत ४६ ते ५० दिवस पाऊस पडला. दरम्यान, मुंबई आणि आसपासच्या भागात पडलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली असून ९९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांत मुंबईत सुमारे २५०० मिमी पाऊस पडतो. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार कुलाबा येथे २३१० मिमी, तर सांताक्रूझ येथे २७८४ मिमी इतकी पावसाची वार्षिक सरासरी आहे. कुलाबा केंद्रावर चार महिन्यांत २४२१ मिमी (१०४ टक्के) तर सांताक्रूझ केंद्रावर २९८९ (१०७ टक्के) पावसाची नोंद झाली. गेल्यावर्षी हवामान विभागाच्या केंद्रांवर ९५ टक्के पावसाची नोंद झाली होती. मुंबईत यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत आतापर्यंत ४६ ते ५० दिवस पाऊस पडला. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. मात्र, जुलैमध्ये साधारण आठ दिवस पडलेल्या अतिमुसळधार पावसाने एकूण हंगामाची सरासरी गाठली आहे.

coal
सप्टेंबर २०२३ मध्ये १६ टक्के वाढीसह कोळशाचे एकंदर उत्पादन झाले ६७.२१ दशलक्ष टन
pre monsoon rains
Weather News: सरासरीपेक्षा कमी पाऊस; मोसमी पावसाचा हंगाम समाप्त; ९४.४ टक्के पर्जन्यमानाची नोंद
Nipah Virus
निपामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण करोनोपेक्षा अधिक, ICMR ने व्यक्त केली चिंता
monsoon update
Weather Update: तीन दिवस संततधार पावसाचा अंदाज

हेही वाचा – सरकारच्या आग्रहामुळे अधिसभा निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय, मुंबई विद्यापीठाचा उच्च न्यायालयात दावा

पालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन यंत्रावर नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९४ टक्के इतकाच पाऊस पडला आहे. शहर भागात चार महिन्यांत २१५६ मिमी, तर पूर्व उपनगरात २४८७ मिमी आणि पश्चिम उपनगरात २५५६ मिमी म्हणजेच एकूण ९४.२२ टक्के टक्के पाऊस पडला आहे.

पाणीपुरवठ्याची चिंता मिटली

सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यातील उर्वरित तूट भरून काढली. सातही धरणांमध्ये सुमारे ९९.२४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणे काठोकाठ भरल्यामुळे वर्षभरातील पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका उपयुक्त पाणीसाठा असावा लागतो. तरच संपूर्ण मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करणे महानगरपालिकेला शक्य होते. सातही धरणांत सध्या १४ लाख ३६ हजार दशलक्ष लिटर म्हणजेच एकूण साठवण क्षमतेच्या ९९.२४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे.

हेही वाचा – नवे विमानतळ मुंबईच्या आणखी जवळ; शिवडी न्हावा शेवा पुलापासून विमानतळापर्यत थेट सागरी किनारा मार्ग

यंदा पावसाळ्यात प्रारंभी मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात असमाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जलसाठा घटला होता. ही स्थिती लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १ जुलै २०२३ पासून १० टक्के कपात केली होती. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे ऑगस्ट महिन्यात मुंबईतील १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली व पाणीसाठा ९० टक्क्यांवर स्थिरावला होता. पाणीसाठ्यात आधीच दहा टक्के तूट होती, त्यातच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीपातळी कमी होऊ लागली होती. त्यामुळे वर्षभरासाठी पाणीकपात लागू करावी लागेल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसाने धरणे काठोकाठ भरली आहेत.

सातही धरणांतील पाणी पुढच्या वर्षी जुलैअखेरपर्यंत पुरेल अशा पद्धतीने जल अभियंता विभागातर्फे नियोजन करण्यात येते. यंदा धरणांमध्ये पुरेसे पाणी असल्यामुळे वर्षभराची चिंता मिटली आहे. शहराला दररोज सर्वाधिक म्हणजे १,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणारे सर्वात मोठे भातसा धरणही यंदा ९९ टक्के भरले आहे. या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ७ लाख १७ हजार दशलक्ष लिटर इतक आहे. नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा या आणखी एका मोठ्या धरणातील पाणीसाठा ९९ टक्के आहे.

पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

२ ऑक्टोबर २०२३ …१४,३६,४०९ दशलक्ष लिटर …. ९९.२४ टक्के

२ ऑक्टोबर २०२२ …१४,२३,०१६ दशलक्ष लिटर …. ९८.३२ टक्के

२ ऑक्टोबर २०२१…१४,३३,३१३ दशलक्ष लिटर …. ९९.०३ टक्के

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 104 to 107 percent rain in mumbai mumbai print news ssb

First published on: 03-10-2023 at 11:23 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×