घडय़ाळाच्या काटय़ांवर धावणाऱ्या मुंबईचा आणि मुंबईकरांचा वेग सांभाळत त्यांची जीवनवाहिनी बनलेली रेल्वे प्रवाशांसाठी मृत्युवाहिनी बनत चालली आहे. रेल्वे रुळावर होणाऱ्या अपघातात दर दिवशी किमान सात ते आठ प्रवासी मृत्युमुखी आणि तेवढेच प्रवासी जखमी होण्याचे प्रकार घडत असताना गेल्या दहा दिवसांत तब्बल १०६ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १०० जण जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १४ महिलांचा समावेश आहे.
मुंबईतील उपनगरीय रेल्वे मृत्यूचा सापळा बनत चालल्याचे वारंवार बोलले गेले आहे. दर वर्षी रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांची संख्या साडेतीन ते चार हजार एवढी असते. तर तेवढेच प्रवासी जखमीही होतात. म्हणजेच सरासरी दिवसाला दहा जण रेल्वेमार्गावर मृत्युमुखी पडतात. ही सरासरी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांतही कायम होती. १६ ते २५ सप्टेंबर या कालावधीत तब्बल १०६ प्रवाशांना रेल्वेमार्गावरील अपघातांत जीव गमवावा लागला, तर १०० प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत. म्हणजेच गेल्या दहा दिवसांत मुंबईच्या रेल्वेमार्गावर २००हून जास्त अपघात झाले आहेत.
या दहा दिवसांमध्ये सर्वात जास्त म्हणजेच १६ मृत्यू २५ सप्टेंबर रोजी झाले. या दिवशी १३ जण विविध अपघातांत जखमीही झाल्याची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे झाली आहे. त्याखालोखाल २० आणि २३ सप्टेंबर रोजीही प्रत्येकी १४ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या दहा दिवसांतील ही आकडेवारी चिंताजनक आहे. गणेशोत्सवाच्या काळात या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.