निशांत सरवणकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : गृहकर्जावर कमी व्याज मिळत असल्यामुळे ही रक्कम परस्पर विकासकांच्या कंपनींना देऊन भरमसाठ फायदा उचलणाऱ्या दिवाण हौसिंग फायनान्स कंपनीचा घोटाळा त्यांनी निर्माण करण्यात आलेल्या समांतर ‘बांद्रा बुक’ खात्यामुळे उघड झाला आहे. १७ बँकांचा समूहाकडून कमी व्याजदराने पावणे दोन लाखांहून अधिक बोगस कर्जदारांच्या नावे कर्ज उचलून ते विकासकांच्या ९१ कंपन्यांना दिले.

हे कर्ज बुडीत म्हणून घोषित झाले तेव्हा गृहकर्जदार बोगस असल्याचे आढळून आले. देशातील सर्वात मोठय़ा बँक घोटाळय़ाप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दिवाण हौसिंग फायनान्सचे कपिल आणि धीरज वाधवान यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याच्या चौकशीत उघड झालेल्या ‘बांद्रा बुक’मुळे काही बडे विकासक, सरकारी अधिकारीही आता अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाची तक्रारच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने फिर्याद म्हणून दाखल करून घेतली आहे. या प्रकरणी दाखल प्राथमिक निष्कर्ष अहवालाची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. दिवाण हौसिंग फायनान्स लि.च्या ‘बांद्रा बुक’चा त्यात उल्लेख आहे. प्रकल्प कर्ज म्हणून दिवाण हौसिंग फायनान्स लि. आणि प्रवर्तकांनी १४ हजार कोटी रुपये वितरित केले असले तरी ‘बांद्रा बुक’ या नावे असलेल्या स्वतंत्र खात्यात त्याची किरकोळ कर्जे म्हणून नोंद आहे. त्यासाठी एक लाख ८१ हजार अस्तित्वात नसलेले किरकोळ कर्जदार निर्माण करण्यात आले आहेत. या किरकोळ कर्जदारांना कर्ज वितरित केल्याचे दाखविण्यात आले असले तरी विकासकांना प्रकल्प कर्ज म्हणून देण्यात आले आहे. या १४ हजार कोटींपैकी ११ हजार कोटी प्रकल्प कर्ज म्हणून तर उर्वरित तीन हजार १८ कोटी दिवाण हौसिंग फायनान्सने स्वत:कडे ठेवले आहेच. 

उदाहरणच घ्यायचे झाले तर, मे. डू इट अर्बन वेन्चर्स इंडिया प्रा. लि. यांना दिलेल्या ६०० कोटींच्या कर्जाचे घेता येईल. येस बँकेने एप्रिल ते जून २०१८ मध्ये दिवाण हौसिंग फायनान्सला ३७०० कोटी रुपये अहस्तांतरणीय डिबेंचर्स स्वरूपात दिले. त्यानंतर दिवाण हौसिंग फायनान्सने मे. डू इट अर्बन व्हेन्चर्स प्रा. लि.ला ६०० कोटी प्रकल्प कर्ज दिले. विशेष म्हणजे या कंपनीत येस बँकेचे अध्यक्ष राणा कपूर यांच्या पत्नी िबदू व मुलगी रोशनी या संचालिका आहेत. हे कर्ज वितरित करताना अनियमितता झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. आणखी एका प्रकरणात अमरीलिस रिएल्टॉर्स, गुलमार्ग रिएल्टॉर्स आणि स्कायलार्क बिल्डकॉन प्रा. लि. या कंपन्यांना २५९९.५० कोटी प्रकल्प कर्ज म्हणून वितरित करण्यात आल्याची नोंदही बांद्रा बुकमध्ये आढळते. या तिन्ही कंपन्या सुधाकर शेट्टी यांच्या सहाना ग्रुपशी संबंधित असल्या तरी या कंपन्यांवर दिवाण हौसिंग फायनान्सचे प्रवर्तक, संचालक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ईमेल्स, बँक खाती, कर्ज खाती आदींमध्ये समानता आढळून आली आहे. २९ फेब्रुवारी २०२० अखेर ९८ कोटींची थकबाकी दाखविण्यात आली आहे. याशिवाय दर्शन डेव्हलपर्स आणि सिगशिया कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या दोन कंपन्यांना ३४९५ कोटींचे प्रकल्प कर्ज वितरित करण्यात आले आहे. त्यापैकी ३९७० कोटी कर्ज थकबाकी आहे. या दोन कंपन्यांना १४ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी कर्ज वितरित करण्यात आले असून या कंपन्यांवर अप्रत्यक्षपणे कपिल व धीरज वाधवान यांचे नियंत्रण असल्याचे दिसून येते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 thousand crore loot from dhfl through bogus home loan accounts zws
First published on: 27-07-2022 at 06:28 IST