1101 crore allocation in union budget for mumbai railway projects mumbai print news zws 70 | Loksatta

मुंबई महानगरातील रेल्वे प्रकल्पांना बळ; केंद्रीय अर्थसंकल्पात १,१०१ कोटी रुपयांची तरतूद 

अर्थसंकल्पात एमयूटीपीसाठी ९१ टक्के अधिक निधीची तरतूद करण्यात आल्याचे एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष चंद गुप्ता यांनी सांगितले

मुंबई महानगरातील रेल्वे प्रकल्पांना बळ; केंद्रीय अर्थसंकल्पात १,१०१ कोटी रुपयांची तरतूद 
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसद भवन परिसरात केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत भाजप खासदारांपुढे विश्लेषण केले.

मुंबई : मुंबई महानगरातील मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पांना (एमयूटीपी) निधीचे मोठे बळ मिळाले आहे. केंद्र सरकारच्या २०२३-२४ अर्थसंकल्पात १,१०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून २०२२-२३ च्या तुलनेत ही ९१ टक्के अधिक निधीची तरतूद आहे, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातील (एमआरव्हीसी) अधिकाऱ्यांनी दिली.

एमआरव्हीसी एमयूटीपीअंतर्गत मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर विविध प्रकल्प राबवीत आहे. या प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० टक्के निधी उपलब्ध करण्यात येतो.  प्रकल्पांसाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात ५७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात एमयूटीपीसाठी ९१ टक्के अधिक निधीची तरतूद करण्यात आल्याचे एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष चंद गुप्ता यांनी सांगितले. 

एमयूटीपीत प्रकल्प कोणते?

’एमयूटीपी २ : सध्या सीएसएमटी – कुर्ला पाचवा – सहावा मार्ग, मुंबई सेन्ट्रल – बोरिवली सहावा मार्ग प्रतीक्षेत आहे.

’एमयूटीपी ३ : एकूण खर्च १० हजार ९४७ कोटी रुपये विरार – डहाणू चौपदरीकरण, पनवेल – कर्जत नवीन दुहेरी उपनगरीय मार्गिका, ऐरोली – कळवा िलक रोड, ४७ वातानुकूलित लोकल, दोन रेल्वे स्थानकांदरम्यान रुळ ओलांडण्याच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करणे.

’एमयूटीपी ३ ए : एकूण खर्च ३३ हजार ६९० कोटी रुपये गोरेगावपर्यंत असलेल्या हार्बरचा बोरिवलीपर्यंत विस्तार, बोरिवली – विरार पाचवा-सहावा मार्ग, कल्याण -आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण – बदलापूर तिसरी – चौथी मार्गिका, १९१ वातानुकूलित लोकल, सीएसएमटी – पनवेल, सीएसएमटी – कल्याण, चर्चगेट – विरार या मार्गावर अत्याधुनिक सीबीटीसी यंत्रणा, रेल्वे स्थानक विकास आदी प्रकल्प आहेत.

’सध्या ऐरोली : कळवा लिंक रोडचे काम सुरू असून यातील दिघा स्थानकाच्या कामालाही गती मिळाली आहे. तर, विरार – डहाणू चौपदरीकर आणि पनवेल – कर्जत दुहेरी उपनगरीय मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. अन्य प्रकल्पांच्या भूसंपादनासह अन्य कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एमयूटीपी ३ ए मधील वातानुकूलित लोकल, सीबीटीसी, हार्बर विस्तार या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाणार आहे.

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पात मिळालेला निधी 

प्रकल्प               कोटी रुपयांत

एमयूटीपी २           १५० कोटी 

एमयूटीपी २ सी        एक कोटी

एमयूटीपी ३           ६५० कोटी 

एमयूटीपी ३ ए         ३०० कोटी

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 04:27 IST
Next Story
राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती; १३ हजार कोटी रुपयांचा निधी