मुंबई : अकरावी प्रवेशाच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या असून पहिल्या विशेष फेरीचे प्रवेश सुरू आहेत. आतापर्यंत अकरावीला १० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून जाहीर करण्याच्या सूचना सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत. महाविद्यालये सुरू होईपर्यंत अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष फेरी ही पार पडणार आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेण्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाणे अशक्य होत होते. विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेत शिक्षण संचालनालयाने पहिल्या विशेष फेरीत जागा वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना ८ जुलैपर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे. विशेष फेरी अंतर्गत ३ लाख ९२ हजार ६९३ विद्यार्थ्यांना जागा वाटप झाले हाेते. त्यातील ३ लाख २४ हजार १०२ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. यामध्ये नियमित फेरीअंतर्गत ३ लाख १२ हजार ९८३ तर कोट्यातंर्गत ११ हजार ११९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

अकरावी प्रवेशाच्या आतापर्यंत शून्य फेऱ्या, तीन नियमित फेऱ्या पार पडल्या असून विशेष फेरीअंतर्गत प्रवेश सुरू आहेत. या पाच फेऱ्यांमध्ये आतापर्यंत १० लाख ७३ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे नाेंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ९९ हजार ४४२ विद्यार्थी हे अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांना पुढील विशेष फेऱ्यांमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. दरम्यान नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने शिक्षण संचालनालयाने १५ जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ हाविद्यालयांना दिले आहेत.

पहिल्या विशेष फेरीसाठी उद्यापर्यंत मुदतवाढ

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध विभागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाना सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे या विद्यार्थांना ८ जुलैपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुलींसाठी विशेष फेरी १० जुलैपासून पहिली विशेष फेरी ८ जुलै रोजी संपल्यानंतर १० जुलैपासून दुसरी विशेष फेरी ही १० जुलैपासून सुरू हाेणार आहे. ही फेरी मुलींसाठी असेल. या फेरीचे शिक्षण संचालनालयाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १० ते ११ जुलै रोजी या फेरीसाठी नोंदणी, भाग १ दुरुस्ती, पसंतीक्रम भरता येणार आहे. १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता जागा वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर ११ वाजल्यापासून १४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर पुढील विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.