मुंबई : यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागातून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत ४ हजार ३०४ ने घट झाली होती. याचा परिणाम अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये दिसून आला. वाणिज्य, विज्ञान व कला अशा सर्वच शाखांच्या कटऑफमध्ये घट दिसून आली आहे. यंदा बहुतांश नामांकित महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये ०.४० ते २ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
मुंबई विभागामध्ये इयत्ता दहावीच्या निकालामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजार ५९१ इतकी आहे. गतवर्षी ही संख्या १७ हजार ८९५ इतकी होती. त्याचप्रमाणे ८५ ते ९० आणि ८० ते ८५ टक्के या श्रेणींमध्येही गतवर्षीच्या तुलनेत यंदा घट झालेली होती. त्यामुळे यंदा अकरावी प्रवेशाच्या कटऑफमध्ये घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
शुक्रवारी जाहीर झालेल्या अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीमध्ये काही महाविद्यालयांमधील कटऑफ स्थिर राहिले असले तरी बहुतांश सर्वच महाविद्यालयांमधील कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या कटऑफमध्ये घसरण झाली. गुणवंताची संख्या कमी झाल्याने ही घसरण झाली असून ८५ ते ९० टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनाही नामांकित महाविद्यालयांमध्ये सहज प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वाणिज्य शाखेसाठी विद्यार्थ्यांची पसंती असलेल्या एच.आर. महाविद्यालयामध्ये कट ऑफ ९३.४० वरून ९३ टक्क्यांवर आला असून, ०.४० टक्क्यांची घसरण झाली आहे. सेंट झेवियर्स महाविद्यालयामध्ये ९०.८० वरून ९०.४० टक्क्यांपर्यंत घट झाली. के.सी. महाविद्यालय आणि जय हिंद महाविद्यालयामध्ये प्रत्येकी सुमारे ०.४० टक्क्यांची घसरण झाली आहे.
मात्र, रुपारेल महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेचा कट ऑफ स्थिर आहे. कला शाखेत सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा कट ऑफ ९३.४० वरून ९२.६०, तर रुईयाचा कटऑफ ९२.४० वरून ९१.८० टक्क्यांपर्यंत घसरला आहे. मात्र रुपारेल महाविद्यालयाचा कटऑफमध्ये वाढ झाली. ८६.८० वरून ८७.६० टक्क्यांपर्यंत कटऑफ वाढला आहे.
विज्ञान शाखेत रुईया महाविद्यालयाचा कटऑफ ९४.४० वरून ९३.२० टक्क्यांवर म्हणजेच तब्बल १.२० टक्क्यांची घसरला आहे. मिठीबाई महाविद्यालयाचा कटऑफही कटऑफ ९१.६० वरून ८८.२० टक्क्यांपर्यंत म्हणजे ३.४० टक्के इतकी घसरण झाली आहे. साठ्ये महाविद्यालयाचा कटऑफ ९१.४० टक्क्यांवरून ८९.४० टक्के म्हणजेच १ टक्के आणि सी.एच.एम महाविद्यालयाचा कटऑफही ९१.६० टक्क्यांवरून ८९.२० टक्के म्हणजे २.४० टक्क्यांनी घसरला आहे.
कटऑफची तुलनात्मक स्थिती (कंसामध्ये गतवर्षीचे टक्केवारी)
| महाविद्यालय | कला (%) | वाणिज्य (%) | विज्ञान (%) |
| एच. आर. कॉलेज, चर्चगेट | ९३.०० (९३.४०) | – | – |
| सेंट झेवियर्स कॉलेज, फोर्ट | ९२.६० (९३.४०) | ९०.४० (९०.८०) | ९२.२० (९३.००) |
| के. सी. कॉलेज, चर्चगेट | ८५.४० | ९१.८० (९२.२०) | ८७.८० (८९.६०) |
| जय हिंद कॉलेज, चर्चगेट | ८९.०० (८९.२०) | ९२.२० (९२.६०) | ८९.४० (९०.८०) |
| रुईया कॉलेज, माटुंगा | ९१.८० (९२.४०) | – | ९३.२० (९४.४०) |
| आर. ए. पोदार कॉलेज, माटुंगा | – | ९४.२० (९४.६०) | – |
| डी. जी. रुपारेल कॉलेज, माटुंगा | ८७.६० (८६.८०) | ९१.४० (९१.४०) | ९१.६० (९२.२०) |
| साठये कॉलेज, विलेपार्ले | ८९.६० (९०.६०) | ८९.६० (९०.६०) | ८९.४० (९१.४०) |
| एम. एल. डहाणूकर कॉलेज, विलेपार्ले | ९१.०० (९१.८०) | – | – |
| भवन्स कॉलेज, अंधेरी | ८४.४० | ८९.८० (९०.६०) | ९०.४० (९१.००) |
| मिठीबाई कॉलेज, विलेपार्ले | ८७.०० (८८.००) | ९१.६० (९२.४०) | ८८.२० (९१.६०) |
| एन. एम. कॉलेज, विलेपार्ले | – | ९३.६० (९५.२०) | – |
| वझे-केळकर कॉलेज, मुलुंड | ८९.४० (८९.२०) | ९२.४० (९३.४०) | ९२.८० (९३.४०) |
| मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स | – | ९२.२० (९३.००) | – |
| सी. एच. एम. कॉलेज, उल्हासनगर | ६०.८० (६३.६०) | ८४.६० (८४.२०) | ८९.२० (९१.६०) |
