मुंबई : अकरावी प्रवेशाच्या शून्य व तीन नियमित फेऱ्या संपल्यानंतर नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ९४ हजार ८९२ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाकडून ‘ओपन टू ऑल’ ही विशेष फेरी राबविण्यात येत आहे. मात्र या फेरीअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी राज्यातील अवघ्या ३ लाख ७० हजार ६९६ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले आहेत. हे प्रमाण प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत निम्मे आहे. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेण्याऐवजी अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे.
अकरावी प्रवेशासाठी १४ लाख ३७ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७ लाख ७८ हजार २५५ विद्यार्थ्यांनी शून्य फेरी व तीन नियमित फेरीअंतर्गत आतापर्यंत प्रवेश घेतले. त्यानंतर शिक्षण संचालनालयाकडून ‘ओपन टू ऑल’साठी २९ जूनपासून नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. या कालावधीत ३५ हजार ४९१ विद्यार्थ्यांनी नव्याने नोंदणी केल्याने अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख ७३ हजार १४७ इतकी झाली आहे.
त्यामुळे ६ लाख ९४ हजार ८९२ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. मात्र ओपन टू ऑल फेरीसाठी अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही ३ लाख ७० हजार ६९६ इतकी आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्ज निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही निम्मी आहे. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेण्याऐवजी अन्य अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे.
विशेष फेरीसाठी सर्वाधिक ६२ हजार ९९१ अर्ज पुणे विभागातून आले आहेत. त्यापाठोपाठ मुंबई विभागातून ५४ हजार ६८८, नाशिकमधून ४८ हजार ३०५, छत्रपती संभाजीनगरमधून ३९ हजार ९९५, तर नागपूर विभागातून २९ हजार ४०४ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन ३ ते ६ जुलैदरम्यान प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच महाविद्यालयांच्या प्राचार्यांनीही या प्रवेशांची वेळेत नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष फेरीसाठी विभागनिहाय अर्ज
विभाग – अर्ज संख्या अमरावती – २०,५१८
छ. संभाजीनगर – ३९,९९५
कोल्हापूर – ३०,०३५ लातूर – २९,७५७ मुंबई – ५४,६८८
नागपूर – २९,४०४
नाशिक – ४८,३०५ पुणे – ६२,९९१
एन. ए. – २,९२३
एकूण – ३,७०,६१६
