मुंबई : शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यास १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग १ भरून नोंदणी करता येणार आहे. तर प्रवेश अर्जाचा भाग-२ भरण्याची सुविधा राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘इज ऑफ लिविंग’ या कार्यक्रमांतर्गत इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय गतवर्षी घेतला आहे. त्यानुसार २०२५-२६ पासून राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येत आहेत. २०२५-२६ मध्ये अनेक अडचणींचा सामना करत अकरावी प्रवेश प्रक्रिया पार पडली होती.

यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी राज्य मंडळाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्जाचा भाग १ भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून विद्यार्थ्यांना https://mahafvicadmissions.in या संकेतस्थळावर अर्जाचा भाग १ भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रवेश अर्जाचा भाग-२ भरण्याची सुविधा राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपलब्ध करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सूचना जाहीर

प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी शिक्षण संचालनालयाकडून महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्य मंडळाशी संलग्न सर्व उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारेच अर्ज करणे आवश्यक आहे. अन्य मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता ११ वीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित मंडळाच्या शाळांशी थेट संपर्क साधावा.

अन्य मंडळांतून इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीला प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनाही ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्तेनुसार आणि निर्धारित निकषांच्या आधारावरच राबविण्यात येणार असून, शेवटच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळेपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. ऑनलाईन प्रणालीशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने प्रवेश दिले जाणार नाही.

अकरावी प्रवेशाची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध

अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या संकेतस्थळावर राज्यातील इयत्ता ११ वीचे वर्ग असलेली महाविद्यालये, उपलब्ध शाखा, माध्यमांची माहिती, प्रवेश क्षमता व रिक्त जागा यांचा सविस्तर तपशील उपलब्ध केला जाणार आहे.

अर्ज करताना अडचण आल्यास संपर्क साधा

विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीन अर्ज नाेंदणी करायची आहे. अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना काही तक्रार आल्यास त्यांनी support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर किंवा मदत क्रमांक ८५३०९५५५६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.