मुंबई : गतवर्षी इयत्ता अकरावीला जवळपास १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने प्रवेश दिले आहेत. या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंद नसल्याने त्यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसण्यास परवानगी मिळणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीला ऑनलाइन पद्धतीने प्रवेश देऊन नियमित करावे, तसेच त्यांना बारावीच्या परीक्षेला बसण्यास मान्यता द्यावी, असे निर्देश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. विद्यार्थी हिताचा निर्णय घेतानाचा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांवर प्रतिविद्यार्थी पाच हजार रुपये दंड आकारण्यासह मुख्याध्यापक आणि प्राचार्यांवर कारवाई करण्याचे निर्देश संचालनालयाने दिले आहेत.
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे गतवर्षी इयत्ता अकरावीला ऑफलाइन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी २०२५-२६ मध्ये केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट नसलेल्या आणि शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावीला ऑफलाइन प्रवेश दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावीला ऑनलाइन पद्धतीने प्रवेश देऊन नियमित करण्याचे आदेश शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना पत्राद्वारे दिले आहेत. तसेच ही प्रक्रिया सात दिवसांत पूर्ण करून त्याचा अहवाल शिक्षण संचालनालयाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील मागवला
ऑफलाइन प्रवेश घेतलेल्या १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नियमित केल्यानंतर बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवरील बैठक व्यवस्था, वर्गखोल्या, बाकांची उपलब्धता, स्वच्छतागृहे, प्रकाश आणि वायुवीजन यांसारख्या सुविधांचा तपशील मागविण्यात आला आहे. तसेच प्रवेश देताना विद्यार्थ्यांकडून आकारलेले शुल्क, परीक्षा घेण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि परीक्षा केंद्रांची क्षमता यांचा विचार करण्यात आला होता का, याचीही माहिती मागविण्यात आली आहे.
नियमबाह्य प्रवेश देणाऱ्यांवर कारवाई
- या विद्यार्थ्यांना शाळेच्या नियमित परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी न पाठवता अन्य परीक्षा केंद्रावर बसविण्याचे निर्देशही दिले आहेत. मुख्याध्यापक, प्राचार्यांवर होणार कारवाई
अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असताना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑफलाइन प्रवेश देऊन नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे यासंदर्भात त्यांच्याकडून लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. - नियमबाह्य प्रवेश देणाऱ्या संस्थांवर प्रत्येक विद्यार्थ्यामागे पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. हा दंड विद्यार्थ्यांकडून कोणत्याही परिस्थितीत वसूल करता येणार नाही. विद्यार्थ्यांकडून दंडाची रक्कम वसूल केल्याचे आढळल्यास संबंधित संस्थेवर गंभीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
- ऑफलाइन प्रवेश देण्यास जबाबदार असलेल्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर वेतनवाढ रोखणे, पदावनती यांसारखी शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत संस्थाचालकांना निर्देश दिले आहेत. संस्थेने चौकशीनंतर दोषी मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांवर कारवाई न केल्यास संबंधित चौकशीचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण संचालनालयाकडे पाठवावा लागणार आहे.
- शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ऑफलाइन प्रवेश दिलेल्या शाळांनी पुन्हा २०२६-२७ मध्ये अकरावीला ऑफलाइन प्रवेश दिला असल्यास, अशा शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांविरोधात गंभीर कारवाई करण्याचा स्वतंत्र प्रस्ताव संचालनालयाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ऑफलाइन प्रवेश दिलेल्या शाळांनी पुन्हा २०२६-२७ मध्ये अकरावीला ऑफलाइन प्रवेश दिला असल्यास, अशा शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांविरोधात गंभीर कारवाई करण्याचा स्वतंत्र प्रस्ताव संचालनालयाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
