मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या नियमित तीन फेऱ्या आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अद्यापपर्यंत प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारी तिसरी विशेष फेरी जाहीर करण्यात आली. तिसऱ्या विशेष फेरीसाठी १ लाख १२ हजार ८८० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. मात्र, त्यानंतरही तब्बल १ लाख ९३ हजार २०६ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५ लाख ४८ हजार ७६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी आतापर्यंत १२ लाख १२ हजार ८८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. नियमित तीन फेऱ्या आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विशेष फेरी-३ अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्ग-१ (नोंदणी) आणि मार्ग-२ (कनिष्ठ महाविद्यालय पसंतीक्रम) पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. या फेरीअंतर्गत २० जुलै रोजी जागा वाटप करण्यात आले. यामध्ये तब्बल १ लाख १२ हजार ८८० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली. संधी मिळालेल्या या विद्यार्थ्यांपैकी ४९ हजार ८६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे आतापर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२ लाख ६२ हजार ७४८ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.

विभागनिहाय आकडेवारीनुसार, मुंबई विभागात सर्वाधिक ३१ हजार ८३९ विद्यार्थ्यांना प्रवेश वाटप करण्यात आले आहे. पुणे १८ हजार १२३, नागपूर १० हजार ७१४ , नाशिक १२ हजार ३००, छत्रपती संभाजीनगर १४ हजार १५७, अमरावती ९ हजार ९५७, कोल्हापूर ९ हजार ३६६ आणि लातूर ६ हजार ४२४ विभागांचा क्रमांक लागतो. विशेष फेरी-३ मध्ये महाविद्यालय निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीत प्रवेश न घेतल्यास संबंधित जागेवरील दावा रद्द होऊ शकतो, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील बहुतांश उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १५ जुलैपासून इयत्ता ११ वीचे वर्ग सुरू झाले असून प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी तातडीने महाविद्यालयाशी संपर्क साधून शैक्षणिक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश निश्चित करून शैक्षणिक वर्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.