12 Minors Missing in Mumbai : केवळ ३६ तासांत मुंबईतून १२ मुले बेपत्ता झाल्याचं वृत्त एव्हाना तुमच्यापर्यंतही पोहोचलं आहे. त्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तुमच्या घरातील मुलांसाठी तुम्ही अधिक काळजी केली असेल. मुंबई हाय अलर्टवर असल्याचंही या वृत्तात म्हटलं होतं. कोणत्या पोलीस ठाण्यातून किती मुलं बेपत्ता झाल्याचीही आकडेवारी यात होती. त्यामुळे तुम्हाला अधिक चिंता वाटली असेल. पण पालकांनो, जरा थांबा. अशा कोणत्याही वृत्तावर विश्वास ठेवण्याआधी यासंदर्भात मुंबई पोलिसांनी काय म्हटलंय ते पाहूयात.
नेमकं कोणतं वृत्त व्हायरल झालं होतं?
व्हायरल मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला होता की मुंबईतील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अवघ्या ३६ तासांत ८ ते १५ वर्षे वयोगटातील आठ मुलींसह १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. दादरच्या शिवाजी पार्कमधून चार मुले, अँटॉप हिलमधू २, मानखुर्द आणि बांगूर नगरसारख्या भागातून तीन मुले बेपत्ता झाल्याचा आरोप कऱण्यात आला होता. यासंदर्भात अपहरणाचे गुन्हेही दाखल करण्यात आले असून संघटित तस्करी नेटवर्कचा सहभाग असल्याचंही सूचित करण्यात आलं होतं.
दरम्यान, हे वृत्त वाऱ्यासारखं पसरलं. अनेक माध्यमांनी खातरजमा न करता हे वृत्त त्यांच्या संकेतस्थळावर आणि वाहिन्यांवर दाखवलं. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिक भीती निर्माण झाली. मात्र, हे वृत्त खोटं असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात आज एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
मुंबई पोलिसांनी काय म्हटलं?
“काही समाज माध्यम खात्यांद्वारे बेपत्ता आणि अपहरण झालेल्या मुलांबाबत चुकीची माहिती व अफवा पसरवली जात आहे. आम्ही या दाव्यांचे पूर्णपणे खंडन करतो. या संदर्भात मुद्दाम खोटी माहिती पसरवून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे (FIR) नोंदवण्यासह कठोर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे”, असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे तुमच्याकडेही असं वृत्त आलं असेल तर पुढे फॉरवर्ड करू नका. अन्यथा तुमच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

