मुंबईत डोंगरी भागातील कौसरबाग ही चार मजली इमारत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्याचबरोबर या दुर्घटनेत ४० जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पीडितांना सर्व प्रकारच्या मदतीचे निर्देशही राज्य सरकारकडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विखे पाटील म्हणाले, कोसळलेली इमारत ही म्हाडाची इमारत आहे मात्र, ती धोकादायक अवस्थेत नसल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. गृहनिर्माण खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. १० ते १५ कुटुंब येथे वास्तव्यास होती. ४० लोक या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरु असून यामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवणं ही आमची प्राथमिकता आहे. त्याचबरोबर या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल.

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश जास्त असण्याची शक्यता आहे. मदत आणि बचावकार्य सुरु असताना पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. चिंचोळी गल्ली असल्याने या ठिकाणी मदतकार्यात अडथळे येत आहेत.

सकाळी ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. स्थानिकांनी ही इमारत कोसळल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलं असून मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे.