12 lakh 25 thousand candidates apply for 18 thousand post of police constable in maharashtra zws 70 | Loksatta

अठरा हजार पदे, आतापर्यंत सव्वाबारा लाख अर्ज !; पोलीस भरतीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद

मुंबईतही सात हजार पदांसाठी भरती होत असून, त्यासाठी चार लाख २९ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्या

अठरा हजार पदे, आतापर्यंत सव्वाबारा लाख अर्ज !; पोलीस भरतीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : राज्यातील पोलीस भरतीत एका पदासाठी सध्या सरासरी ६८ उमेदवार स्पर्धेत आहेत. राज्यभरातील १८ हजार पदांसाठी मंगळवापर्यंत सव्वाबारा लाख उमेदवारांनी अर्ज केले. मुंबईतील सात हजार पदांसाठी चार लाख २९ हजार अर्ज आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

दरवर्षी राज्यात पोलिसांच्या सुमारे सहा हजार पदांसाठी भरती होते. मात्र, करोनामुळे दोन वर्षांनंतर भरती होत आहे. तसेच मीरा-भाईंदर व पिंपरी-चिंचवड ही आयुक्तालये वाढल्यामुळे यंदा १८ हजार ३३१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मंगळवापर्यंत राज्यभरातून १२ लाख २५ हजार उमेदवारांनी त्यासाठी अर्ज केले. त्यातील दीड लाख अर्जदारांनी शुल्क भरले नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस भरतीच्या प्रत्येक पदासाठी सरासरी ६७ उमेदवारांनी अर्ज केला आहे.

मुंबईतही सात हजार पदांसाठी भरती होत असून, त्यासाठी चार लाख २९ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात ६९ हजार ३४४ महिलांचा समावेश आहे. पोलीस शिपाई, चालक व राज्य राखीव पोलीस दल यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. सुरूवातीचे काही दिवस अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या फार कमी होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांत सरासरी दीड ते दोन लाख अर्जाची नोंद होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे १४ लाख अर्ज येणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या पदासाठी बारावीपर्यंत शिक्षणाची अट आहे. पण, दरवर्षी अर्ज करणारे जवळपास ५५ टक्के उमेदवार पदवीधर असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

एकाच वेळी अनेक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्यमची तक्रार उमेदवार करत होते. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, तर काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी वेळ लागत असल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून करण्यात येत होत्या.

१५ दिवसांची मुदतवाढ

पोलीस भरतीसाठी ३० नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. मात्र, ही मुदत आणखी १५ दिवसांनी वाढवल्याची माहिती  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आता १५ डिसेंबर ही ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत राहील. त्यामुळे अर्जाची संख्या आणखी वाढणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 04:58 IST
Next Story
आरक्षित जागांवरील बिगरआदिवासी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ